Kiren Rijiju : राज्यात विधानसभा (Assembly Elections 2024) निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. याच पार्श्ववभूमीवर सर्व पक्षांनी कंबर कसली असून प्रचाराला सुरुवात केली आहे. अशातच भाजपने केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) हे देखील निवडणुकीपूर्वीच मैदानात उतरवले आहेत.
आज (शुक्रवारी) किरेन रिजिजू नागपूर दौऱ्यावर आहेत. येथे यांनी दीक्षाभूमीला अभिवादन केले. त्यानंतर प्रत्रकार परिषदेत सवांद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला तसेच राहुल गांधी हे विरोधी पक्षनेतेपदी असणे हा भारतासाठी ‘शाप’ असल्याचे त्यांनी म्हंटले.
पुढे रिजिजू म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वाधिक अपमान काँग्रेसने केला आहे. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडले, असे असतानाही काँग्रेसच्या भूलथापांना आमचा समाज बळी पडला. काँग्रेस पक्ष हाच संविधानाचा मारेकरी असून, त्यांना मतदान केल्यास जनता आपल्याला कधीच माफ करणार नाही.
पुढे ते म्हणाले, ‘राहुल गांधींनी ना संविधान वाचले आहे ना त्यांना त्याचा आत्मा कळला, राहुल गांधींसारख्या व्यक्तीचे विरोधी पक्षनेते होणे हे आपल्या देशासाठी ‘शाप’ आहे. अशा व्यक्तीने संविधानाला हात लावणेही अयोग्य आहे असे माझे मत आहे.
‘ज्या व्यक्तीने राज्यघटना वाचलेली नाही. ज्यांच्या संपूर्ण कुटुंबाने बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाचा अपमान केला, त्यांच्या तोंडातून संविधान हा शब्दही अपमानास्पद आहे. अशा व्यक्तीने संविधानाच्या पुस्तकाला हात लावणेही योग्य नाही. अशी व्यक्ती विरोधी पक्षनेते झाली आणि मला त्यांना सामोरे जावे लागत आहे हे आमचे दुर्दैव आहे. अशी टीका त्यांनी यावेळी केली.
लोकसभेच्या निवडणुकीत महविकास आघाडीच्या संविधान बदलणारच्या प्रचाराने भाजपला जोरदार धक्का बसला होता. विधानसभेतही असे राजकारण होण्याची शक्यता असल्याने भाजपकडून त्याची आधीपासूनच खबरदारी घेतली जात आहे.