Maharashtra : या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, AIMIM ने काँग्रेस आणि NCP-SP (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) यांच्याशी संपर्क साधला असून 28 मुस्लिम बहुल मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडी (MVA) सोबत युती करण्याची मागणी केली आहे. माजी खासदार आणि AIMIM पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी याविषयी बोलताना सांगितले, AIMIM ने काँग्रेस आणि NCP-SP च्या अध्यक्षांना 28 जागांचा प्रस्ताव पाठवला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर इम्तियाज जलील म्हणाले, ‘एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचा सल्ला घेतल्यानंतर आम्ही एक पत्र तयार केले आहे. ते पत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी-सपा यांना पाठवले आहे. उद्धव ठाकरे नवीन पुरोगामी आहेत, त्यांना MIM सोबत हवी का याबाबत त्यांची भूमिका माहिती आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला नवीन पुरोगामी चालतात, मग आमच्याबाबत काय आक्षेप आहेत असे प्रश्नही लेखी पत्रात उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले, आम्ही अद्याप जागेची यादी दिलेली नाही. महाविकास आघाडी आम्हाला सोबत घ्यायला तयार आहे का हे स्पष्ट झाल्यानंतर आम्ही आमची यादी घेऊन चर्चेला येऊ. जेव्हा आघाडी असते तेव्हा ताकदेनुसार जागा मागितली जाते. आघाडीत सर्व पक्षांचा विचार करावा लागतो. मविआकडून आमच्या प्रस्तावर होकार आला तर आम्ही त्यावर बसून चर्चा करू. पण मविआने नकार दिला तर ज्या मतदारसंघात मुस्लीम समुदाय जास्त आहे, दलित समाज अधिक आहे त्यानुसार आमची यादी जाहीर करू. ज्या जागा आम्ही मागील वेळी जिंकल्यात भिवंडी, मालेगाव, धुळे, भायखळा, वर्सोवा या जागेवर आमची ताकद आहे. या जागेवर आम्ही तडजोड करायला तयार आहे. मुस्लीम बहुल २८ मतदारसंघ आहे. जिथे मुस्लिमांना उमेदवारी दिली तर ते निवडून येतील असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. पुढे त्यांनी महाविकास आघाडीकडून सकारात्मक उत्तर येईल असा देखील विश्वास दाखवला आहे.
या वर्षी नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. सध्या 103 आमदारांसह भाजप विधानसभेत सर्वात मोठा पक्ष आहे. याशिवाय शिवसेनेचे 40, राष्ट्रवादीचे 41, काँग्रेसचे 40, शिवसेना (यूबीटी) 15, राष्ट्रवादी-सपा 13 आणि अपक्ष 29 आमदार आहेत.