India Women vs Pakistan Women : महिला T20 विश्वचषक 2024 (ICC Women’s T20 World Cup 2024) मध्ये, भारतीय संघाने कालच्या सामन्यात पाकिस्तानचा (Pakistan Women’s National Cricket Team) पराभव करत आपले विजयाचे खाते उघडले आहे. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 58 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर टीम इंडियासाठी (India Women Cricket Team) हा सामना जिंकणे महत्वाचे होते. कालच्या या सामन्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. पाकिस्तान-इंडियाच्या या हायहोल्टेज सामन्यात अखेर टीम इंडियाने विजय मिळवत आपल्या मोहिमेला चांगली सुरुवात केली आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. सर्वप्रथम, श्रेयंका पाटील आणि अरुंधती रेड्डी यांच्या शानदार गोलंदाजीमुळे भारतीय संघ पाकिस्तानला अवघ्या 105 धावांवर रोखण्यात यशस्वी ठरला. यानंतर शेफाली वर्मा आणि हरमनप्रीतच्या फलंदाजीमुळे संघाने हे लक्ष सहज गाठले आणि विजय मिळवला.
भारतीय महिला संघाने केला ‘हा’ विक्रम
महिला टी-20 विश्वचषकात पाकिस्तानी संघाविरुद्ध भारतीय संघाचा हा सहावा विजय आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण 8 सामने झाले असून, त्यापैकी केवळ दोनच सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध 6 सामने जिंकणारा भारतीय संघ एकमेव आहे. आजपर्यंत कोणत्याही संघाला महिला टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध इतके सामने जिंकता आलेले नाहीत. या विजयासह भारताने इंग्लंडला मागे टाकले आहे. महिला टी-20 विश्वचषकात इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध पाच सामने जिंकले आहेत. तर टीम इंडियाने सहा सामने जिंकले आहेत.
महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकणारे संघ :
भारत : 8 सामन्यात 6 विजय
इंग्लंड : 5 सामन्यात 5 विजय
ऑस्ट्रेलिया : 3 सामन्यात 3 विजय
न्यूझीलंड : 3 सामन्यात 3 विजय
दक्षिण आफ्रिका : 3 सामन्यांत 3 विजय