Harshvardhan patil : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly elections) अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. अशातच भाजप नेते हर्षवर्धन पाटील (हर्षवर्धन पाटील) आज भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश (NCP Sharad Pawar) करत आहेत. अशास्थितीत हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
हर्षवर्धन पाटील आज शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहेत. आज इंदापूरमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, या पक्षप्रवेशा अगोदर हर्षवर्धन पाटलांनी एक सूचक विधान केले आहे.
इंदापूरमधल्या कार्यकर्त्यांची ही अपेक्षा होती. हा जनतेचा उठाव आहे. सर्व जातीधर्मांच्या लोकांचा हा उठाव आहे. त्यांची इच्छा होती की राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात आपण प्रवेश करावा. त्यानुसार तो प्रवेश आज होतोय. माझ्यासह सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी हजारोंच्या संख्येनं पक्षप्रवेश करत आहोत. असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.
पुढे, जनतेचा आग्रह होता की तुम्ही इथून निवडणूक लढवली पाहिजे. दुसरं म्हणजे बऱ्याच निवडणुकांपासून आमच्या विचारांचे कार्यकर्ते या मतदारसंघात लोकप्रतिनिधी झाले आहेत. मागच्या निवडणुकीत आम्ही १५०० मतांनी जिंकता जिंकता राहिलो. शेवटी जनता श्रेष्ठ आहे. म्हणून जनतेच्या आग्रहासाठी आम्ही शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे”, असेही ते म्हणाले.
हर्षवर्धन पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेशाचा निर्णय जाहीर केला होता. आज इंदापूरमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांचा पक्षप्रवेश होत असून त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.