Harshvardhan patil : इंदापूरमधल्या कार्यकर्त्यांची ही अपेक्षा होती. हा जनतेचा उठाव आहे. सर्व जातीधर्मांच्या लोकांचा हा उठाव आहे. त्यांची इच्छा होती की राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) (Sharad Pawar) पक्षात आपण प्रवेश करावा. त्यानुसार तो प्रवेश आज होतोय. असं म्हणत हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी आज हाती तुतारी घेतली आहे.
इंदापूर येथे आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या कन्या अंकिता पाटील आणि कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशावेळी खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे तसेच इतर राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेशाचा निर्णय जाहीर केला होता. त्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी पक्षप्रवेशाची तारीख स्वत: शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे ठरवतील, असे सांगतिले होते.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावर आता उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्या शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. नागपुरात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशाविषयी विचारण्यात आले. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही नवीन काय सांगताय, ही तर जुनी बातमी आहे, ही आजची न्यूज थोडी आहे, असे उत्तर त्यांनी यावेळी दिले आहे.