Iran Israel Attack : इराण (Iran) आणि इस्रायलमध्ये (Israel) आता चांगलेच युद्ध पेटले आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले सुरु आहेत. यादरम्यान, इस्रायल इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करणार असल्याचे बोलले जात आहे. इस्रायलने इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ला केला तर अमेरिका त्यांना पाठिंबा देईल का? असा प्रश्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांना नुकताच विचारण्यात आला होता, त्यावर जो बायडेन यांनी असे झाल्यास आम्ही पाठिंबा देणार नाही असे म्हंटले होते.
पण आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी उभे असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांच्या विरोधात वक्तव्य करत इस्रायलने इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ला केला पाहिजे. असे म्हंटले आहे. शनिवारी एका निवडणूक रॅलीत ते बोलत होते.
ट्रम्प म्हणाले की, जेव्हा बायडेन यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांचे उत्तर आधी अणुकेंद्रांवर हल्ले करा असे हवे होते. त्यांनी बाकीची काळजी नंतर करायला हवी होती, कारण हा सर्वात मोठा धोका आहे. ट्रम्प म्हणाले, तुम्ही हे का करू नये? म्हणजे, अण्वस्त्र हा सर्वात मोठा धोका आहे.
यावेळी ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ला करण्याचा सल्ला दिला आहे.
इराण आणि इस्रायलमधील युद्ध उघडपणे पेटले आहे. जरी संपूर्ण युद्ध घोषित केले गेले नाही, तरीही तणाव कमी नाही आणि दोघेही एकमेकांवर बॉम्ब आणि क्षेपणास्त्रे हल्ले करत आहेत. या सगळ्यात अमेरिका इस्रायलला साथ देत आहे. आपण इस्रायलच्या पाठीशी असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेने वारंवार केला आहे. पण तरीही बायडेन इराणच्या अणुकेंद्रांवर लक्ष्य करण्याच्या बाजूने नाहीत. पण ट्रम्प यांचे मत याच्याविरुद्ध आहे. खास गोष्ट म्हणजे अमेरिकेत लवकरच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत आणि जर ट्रम्प अध्यक्ष झाले तर त्यांचे हे मत असेच राहणार की बदलणार हा मोठा प्रश्न आहे.