RG Kar Medical College : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (R G Kar Medical College and Hospital) घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज 50 वरिष्ठ डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. रुग्णालयातील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिच्या हत्या केल्याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर संपावर होते. महिला डॉक्टरला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी डॉक्टरांनी संप पुकारला होता. यादरम्यान, आता 50 वरिष्ठ डॉक्टरांनी एकाचवेळी राजीनामा दिल्याची बातमी येत आहे.
रुग्णालयातील विविध विभागांच्या प्रमुखांच्या बैठकीत या ज्येष्ठ डॉक्टरांनी हा निर्णय घेतला. आजच्या बैठकीत आमच्या रुग्णालयातील सर्व 50 वरिष्ठ डॉक्टरांनी एकत्रितपणे राजीनामा पत्रांवर स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतला, असे एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले आहे. हे पाऊल एका महत्त्वाच्या कारणासाठी लढणाऱ्या तरुण डॉक्टरांसोबतच्या आमच्या एकतेचे प्रतीक असल्याचे म्हणत त्यांनी राजीनामा दिला असल्याचे म्हंटले आहे.
तर एनआरएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टरही आरजी कर हॉस्पिटलमधील त्यांच्या सहकाऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळत आहे.
महिला डॉक्टर प्रकरणी लवकर न्याय मिळावा या मागणीसोबतच ज्युनिअर डॉक्टरांनी आरोग्य यंत्रणेतील भ्रष्टाचाराविरोधातही आवाज उठवला आहे. शनिवार पासून ज्युनिअर उपोषणावर आहेत, अशास्थितीत त्यांना पाठिंबा म्हणून वरिष्ठ डॉक्टरांनी हा निर्णय घेतला आहे.
वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘ज्युनियर डॉक्टर आपल्या मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत, मात्र अद्यापही या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. निवेदनात आमरण उपोषणावर असलेल्या डॉक्टरांच्या आरोग्याच्या स्थितीबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. पुढे निवेदनात, ज्युनियर डॉक्टरांच्या पाठीशी एकजुटीने उभे राहू, असेही म्हटले आहे.