हरियाणामध्ये सुरुवातीला काँग्रेसने आघाडी घेतली होती. मात्र, 10 वाजल्यानंतर भाजपने काँग्रेसला (Congress) मागे टाकत हरियाणात (Haryana) एकहाती विजय मिळवला. मात्र, यानंतर काँग्रेसने थेट निवडणूक आयोग गाठले. त्याचवेळी आता आयोगाने देखील काँग्रेसच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे आरोप हे बेजबाबदार आणि निराधार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने सांगितले की, ‘निवडणूक आचार नियमांच्या नियम 60 नुसार आणि वैधानिक आणि नियामक नियमांचे पालन करून संबंधित मतमोजणी केंद्रांवर मतांची मोजणी केली जात आहे. ही प्रक्रिया नियुक्त अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. तसेच, निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या सरचिटणीस जयराम रमेश यांना सांगितले की, वेबसाइटवर निकाल अपडेट करण्यात विलंब झाल्याचा खोटा आरोप सिद्ध करण्यासाठी तुच्याकडे कोणताही पुरावा नाही.’
निवडणूक आयोगाने पुढे माहिती दिली की, ‘हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीरमधील संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया उमेदवार, निरीक्षक आणि सूक्ष्म निरीक्षकांच्या उपस्थितीत नियमानुसार सुरू आहे.’
काँग्रेसने काय आरोप केले होते?
हरियाणात घडलेल्या घडामोडीनंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, हरियाणाचे निकाल सकाळी 9 ते 11 या वेळेत वेबसाइटवर अपलोड करण्यात विलंब झाला असल्याचा आरोप करत निकाल अपडेट करण्याच्या संथ गतीमुळे नवीन कथा तयार झाल्या. असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हंटले आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘लोकसभा निवडणुकीप्रमाणेच हरियाणामध्येही निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर ट्रेंड अपलोड करण्याची गती मंद आहे. आम्हाला आशा आहे की, निवडणूक आयोग आमच्या प्रश्नांची उत्तरे देईल. 10-11 च्या फेऱ्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. मात्र, निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर केवळ 4-5 फेऱ्या अपडेट करण्यात आल्या आहेत. प्रशासनावर दबाव आणण्याची ही रणनीती आहे. असे ते म्हणाले.
त्याचवेळी भाजप नेते शेहजाद पूनावाला यांनी या आरोपांवरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ’11 ते 11.30 पर्यंत त्यांच्या (काँग्रेस) प्रवक्त्यांनी निवडणूक आयोगाला फटकारण्यास सुरुवात केली. 12 वाजेपर्यंत जयराम रमेश यांनी देशातील संस्थांवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली, हरियाणा असो वा जम्मू-काश्मीर, जनतेने काँग्रेस पक्षाला स्पष्ट संदेश दिला आहे की कुस्तीपटू, सैनिक, युवक आणि शेतकरी हे सर्वच पंतप्रधान मोदींचा आदर करतात. राहुल गांधी यांच्याकडे द्वेषाचे दुकान आहे आणि म्हणूनच हरियाणातील राहुल गांधींच्या तथाकथित ‘मोहब्बत की दुकान बंद’ येथील जनतेने बंद केली आहे. तसेच ते पुढे म्हणाले हरियाणात पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा आपले सरकार स्थापन होत आहे…हा ऐतिहासिक विजय आहे.