Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (बुधवारी) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महाराष्ट्रात 7,600 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. यामध्ये ते नागपुरातील 7 हजार कोटी रुपयांच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विमानतळाच्या अपग्रेडेशनची देखील पायाभरणी करणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाकडून सादर करण्यात आलेल्या निवेदनानुसार, विमानतळाच्या अपग्रेडमुळे उत्पादन, विमान वाहतूक, पर्यटन, लॉजिस्टिक आणि आरोग्यसेवा यासह अनेक क्षेत्रांच्या वाढीला चालना मिळेल, ज्याचा फायदा नागपूर आणि विदर्भाला होईल. शिर्डी विमानतळावर 645 कोटी रुपयांच्या नवीन एकीकृत टर्मिनल इमारतीची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.
निवेदनात पुढे सांगितले आहे की, ‘सर्वांसाठी परवडणाऱ्या आणि सुलभ आरोग्य सुविधा सुनिश्चित करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून, मोदी महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, जालना, अमरावती, गडचिरोली, बुलढाणा, वाशीम, भंडारा, हिंगोली आणि अंबरनाथ (अंबरनाथ) ठाणे येथे 10 सरकारी वैद्यकीय महाविद्याले सुरु करणार आहेत.
पंतप्रधानांचा लाओस दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10-11 ऑक्टोबर रोजी लाओसच्या दौऱ्यावर असतील, जिथे त्यांना 21व्या आसियान-भारत ( ‘Association of South-East Asian Nations’) शिखर परिषद आणि 19व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत भाग घ्यायचा आहे. आसियान देशांसोबतचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधानांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी याबद्दल सांगितले की, भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाला 10 वर्षे पूर्ण होत असताना ही भेट अधिक महत्त्वाची झाली आहे. (ऍक्ट ईस्ट पॉलिसीचा उद्देश अरुणाचल प्रदेशसह ईशान्येकडील राज्ये आणि शेजारील राष्ट्रांमधील संपर्क वाढवणे आहे.)
ऍक्ट ईस्ट धोरण आणि इंडो-पॅसिफिक दृष्टिकोन हे भारताच्या आसियान देशांसोबतच्या संबंधांमध्ये केंद्रस्थानी मानले जातात. लाओसचे पंतप्रधान सोनेक्से सिफंडन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी दोन दिवस लाओसची राजधानी व्हिएन्टिनमध्ये राहणार आहेत. लाओस हा दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनेचा (ASEAN) सध्याचा अध्यक्ष देश आहे. लाओसमध्ये आयोजित होणाऱ्या दोन शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान सदस्य देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेतील.