Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला, या निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत मिळाले आहे. अशातच, जम्मू-काश्मीर मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अनंतनाग (Anantnag) जिल्ह्यातील कोकेरनाग येथील शांगस भागात दहशतवाद्यांनी दोन (Two Indian Army Soldiers) भारतीय लष्कराच्या जवानांचे अपहरण (kidnapped) केल्याची माहिती मिळत आहे.
दोन जवानांपैकी एक जण तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला, तर एक अद्याप बेपत्ता आहे. बेपत्ता जवानाचा शोध सुरक्षा दल घेत आहे. दहशतवाद्यांनी अपहरण केलेला जवान हा प्रादेशिक लष्कराचा होता.
ऑगस्ट 2020 च्या सुरुवातीला, काश्मीरमध्ये अशीच एक घटना घटना घडली होती. दहशतवाद्यांनी प्रादेशिक आर्मीचे शिपाई शाकीर मंजूर वाजे यांचे अपहरण केले होते, त्यानंतर पाच दिवसांनी कुटुंबाला त्यांचे कपडे घराजवळ सापडले. शिपाई शाकीर मंजूर वाजे हे त्यांच्या घरजवळून बेपत्ता झाले होते.
दरम्यान, सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील गुगलधर येथे घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. यावेळी लष्कर आणि पोलिसांनी येथे दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय लष्कराने सांगितले होते की, 4 ऑक्टोबर 2024 रोजी लष्कर आणि पोलिसांनी संशयास्पद हालचाली पहिल्या त्यानंतर संयुक्त ऑपरेशन सुरू करण्यात आले. यावेळी काही दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवादी कारवाया पाहायला मिळत आहेत. ज्यावर सुरक्षा दलांनीही कारवाई केली आहे. ऑगस्टमध्ये सुरक्षा दलांनी अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा भागात दहशतवाद्यांच्या तीन साथीदारांना अटक केली होती. कारवाईदरम्यान, सुरक्षा दलांनी अटक केलेल्या साथीदारांच्या ताब्यातून पिस्तूल, 29 गोळ्या आणि दोन हातबॉम्ब जप्त केले आहेत.