Maha vikas Aghadi : हरियाणा विधानसभा निवडणुकीचे (Haryana Election Result) निकाल मंगळवारी 8 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले, ज्यामध्ये काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. हरियाणात काँग्रेसला मिळालेल्या पराभवानंतर मात्र, महाविकास आघाडीतील सूर बदलू लागले आहेत.
हरियाणात मिळालेल्या पराभवानंतर मित्रपक्षांनी आगामी महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आपल्या निवडणूक रणनीतीवर पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे.
इंडिया आघाडीचा भाग असलेले आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला पराभवातून धडा घेण्याचा सल्ला दिला आहे. केजरीवाल म्हणाले, “निवडणुकीचा सर्वात मोठा धडा म्हणजे कोणीही अतिआत्मविश्वास ठेवू नये. प्रत्येक निवडणूक आणि प्रत्येक जागा आव्हानात्मक असते आणि कोणीही या निवडणुकीला हलक्यात घेऊ शकत नाही. हरियाणा निवडणुकीत काँग्रेसने ही चूक केली असावी आणि त्यांनी ती चूक भविष्यात टाळली पाहिजे.”
तर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेत्या प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, ‘हरियाणाच्या निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांवर थेट परिणाम होणार नाही, परंतु काँग्रेसने आपल्या निवडणुकीच्या रणनीतीवर पुनर्विचार करावा. हरियाणात भाजपविरुद्धच्या लढतीत काँग्रेसने निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे.’
तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळले आहे. सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ‘हरयाणा व जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजप-काँग्रेससाठी धक्कादायक असून हरयाणात फाजील आत्मविश्वास व स्थानिक नेत्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसचा पराभव झाला आहे. हरयाणात भाजप सत्तेत येईल हे कुणीच ठामपणे सांगत नव्हते. काँग्रेसचा या निवडणुकट एकतर्फी विजय मिळवेल असे चित्र असतांना जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर कसे करायचे हे काँग्रेसकडूनच शिकावे लागणार आहे.’ अशी खोचक टीका त्यांनी ‘सामना’तून केली आहे.
दरम्यान, काँग्रेसने महाराष्ट्रातील आपल्या मित्र पक्षांना प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून, यावेळीही आघाडी मजबूत करण्यासाठी काम करेल, असे काँग्रेसने म्हटले आहे.