पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगराच्या वतीने विजयादशमीला शनिवारी (ता.12) 58 स्थानांवर पथसंचलन आयोजित करण्यात आले आहे. संघदृष्ट्या महानगरातील नऊ भागांमध्ये पूर्ण गणवेशात स्वयंसेवकांचे हे शिस्तबद्ध संचलन पार पडेल.
विजयादशमीच्याच दिवशी नागपूरातील मोहिते वाड्यात 1925 मध्ये संघाची स्थापना झाली होती. त्यामुळे दरवर्षी विजयादशमीला संघाचे स्वयंसेवक देशभरात पथसंचलनांचे आयोजन करतात. यंदा संघ शताब्दी वर्षात प्रवेश करत असल्याने पथसंचलनांना एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. बहुतेक स्थानांवर सकाळी तर काही नगरांत संध्याकाळी पथसंचलन पार पडेल. घोषाच्या वादनात शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणारे हे संचलन केवळ स्वयंसेवकांमध्ये नाही तर नागरिकांमध्येही राष्ट्रभक्तीची भावना जागृत करते.
संचलनाद्वारे विविध महापुरूषांनाही अभिवादन करण्यात येते. 58 संचलनांच्या माध्यातून महानगरातील हजारो स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सहभागी होत आहे. नुकतेच शस्त्रपूजनाचा उत्सवही प्रत्येक भागात पार पडला. संघाच्या सहा उत्सवांपैकी विजयादशमी एक प्रमूख उत्सव आहे. याच दिवशी नागपूरात होणारे सरसंघचालकांचे भाषण संघाच्या आगामी वाटचालीची आणि स्वयंसेवकांच्या कार्याची दिशा स्पष्ट करते.