Haryana Election Result 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल (Haryana Election Result 2024 ) जाहीर झाले आहेत. हरियाणाच्या लढाईत भाजपने ऐतिहासिक हॅटट्रिक करत तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे विजयाचा दावा करणाऱ्या काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला आहे.
हरियाणात मिळालेल्या या विजयानंतर भाजपने विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी स्विगी करून एक किलो जलेबी पाठवली आहे. यासंबंधितचे एक ट्विट देखील सोशल मीडियावर शेअर केले आहे. हरियाणात भाजपला बहुमत मिळाल्यानंतर जिलेबी वाद चांगलाच पेटला. नेमका काय आहे हा वाद? जाणून घेऊया…
खरं तर हरियाणातील निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी गोहना येथे गेले होते. तेथे त्यांनी गोहना येथील प्रसिद्ध मतुराम हलवाई यांनी तयार केलेला जिलेबीचा डबा जनतेला दाखवला. आणि ते देशभर विकले जावे आणि निर्यातही व्हावे, असे ते म्हणाले होते. यामुळे रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील, त्यामुळे या मिठाईच्या दुकानाचे रूपांतर कारखान्यात होईल आणि 20 ते 50 हजार लोक त्यात काम करू शकतील.’
राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी त्यांची चांगलीच खिल्ली उडवली. तसेच राहुल गांधी नीट गृहपाठ करून येत नाहीत असा टोला देखील लगावला होता. अशातच हरियाणातील निकालानंतर पुन्हा एकदा भाजप नेत्यांनी जिलेबी मुद्दा उचलून धरला आणि आज थेट राहुल गांधींच्या घरी जिलेबी पाठवली.
भारतीय जनता पार्टी हरियाणा के समस्त कार्यकर्ताओं की तरफ से राहुल गांधी जी के लिए उनके घर पर जलेबी भिजवा दी है🙏🏻 pic.twitter.com/Xi8SaM7yBj
— Haryana BJP (@BJP4Haryana) October 8, 2024
हरियाणा निवडणुकीतील विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या अकबर रोडवरील निवासस्थानी एक किलो जलेबी पाठवली आहे. भाजप हरियाणाने याचे बिल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर देखील शेअर केले आहे. या पोस्टच्या ॲड्रेस नोटमध्ये राहुल गांधी यांच्यासाठी जलेबी असेही लिहिले आहे.
भाजप हरियाणाच्या या पोस्टनंतर युजर्स चांगलीच मजा घेत आहेत. काही युजर्सनी राहुल गांधींवर जोरदार टीका करत आहेत. तर अनेक युजर्सनी भाजपला टोला लगावत आहेत.
हरियाणातील निवडणुकीचे निकाल
हरियाणामध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागांपैकी भाजपने 48 जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळवले. त्याचवेळी काँग्रेस आघाडीला केवळ 37 जागा जिंकता आल्या आहेत. तर दोन जागा आयएनएलडीच्या खात्यात गेल्या, आणि तीन जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत.