भारतातील सर्वात मोठ्या समूहांपैकी एक असलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा ( Ratan Tata ) यांचे बुधवारी रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.आज दुपारी 3.30 वाजता त्यांच्यावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.दानशूर, दयाळू, दिलदार, देशप्रमी, नफा-तोटा न पाहणारा उद्योगपती अशी रतन टाटा यांची ओळख होती. त्यामुळे रतन टाटा यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे.
प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री उशिरा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.रतन टाटा यांचे पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी नरिमन पॉईंट येथील एनसीपीए येथे आणण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदींसह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी टाटा यांना श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त केला आहे.रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतील.तसेच महाराष्ट्रात आज कुठलाही मनोरंजनाचा कार्यक्रम होणार नाही.रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोएल टाटा आणि टाटा कुटुंबीयांशी संवाद साधत शोक व्यक्त केला आहे. समोर आलेल्या अधिकृत माहितीनुसार केंद्र शासनाच्या वतीनं केंद्रीय गृह मंत्री अमित शाह रतन टाटा यांच्या अंत्यविधीसमयी उपस्थित राहतील असे सांगण्यात आले आहे.