मला दिल्लीकरांची पर्वा नाही. किती पिढ्या यायच्या तितक्या येऊ द्या, मी इथे त्यांना गाडून त्यांच्या उरावर भगवा फडकवून दाखवेन, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला आहे . शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर साजरा झाला. त्यात ते बोलत होते.
ठाकरे पुढे म्हणाले, शेवटी आपलं कोणी नसतं, आपल्यासोबत जो उभा आहे, तो आपला आणि आपल्याविरुद्ध लढायला जो उभा आहे तो आपला नाही. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी हीच शिकवण दिलीय, स्वराज्यावर चालून आला तो आपला शत्रू. स्वराज्यावर चालून आलेल्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा वध केला नसता, तर आज आपण कुणीही नसतो. मात्र, भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला, आठ महिन्यात पुतळा कोसळला. मी वचन देतो, आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मी शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार, कारण शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. जसं श्रीरामाने रावणाचा वध केला म्हणून आपण आज दसरा साजरा करतो आहोत .
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली, राज्याभिषेक दिन आला की हार घालायचा आणि शिवाजी महाराज की जय असं म्हणायचं, एवढचं आपलं काम नाही. मोदीजी तुम्हाला आणि तुमच्या सरकारला शिवाजी महाराज हे केवळ मत मिळवण्याचं मंत्र वाटत असेल, पण ते ईव्हीएम नाही. शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. हे दैवत आपलं आहे, आपण नाही पुजायचं, मग कोणी पुजायचं. जो शिवाजी महाराजांच्या मंदिराला विरोध करेल, त्याला माझा महाराष्ट्र बघून घेईल, असेही ठाकरेंनी आपल्या भाषणातून म्हटले आहे .
“आनंद दिघे असते तर शिंदेला गोळ्या घातल्याच असत्या. असे महिलांवर अत्याचार करणारे शिंदे जगायच्या लायकीचे नाही”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आहे .
यंदा प्रथमच युवा नेते आदित्य ठाकरे यांचे भाषण झाले. आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. तसेच आपण प्रथमच शिवतीर्थाच्या व्यासपीठावरुन बोलत आहोत असे सांगत त्यांनी आपले आजोबा स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. आदित्य ठाकरे यांनी माझ्या मागे वडीलांचा, आजोबांचा आणि पणजोबांचा आशीर्वाद असल्याचे यावेळी सांगितले.
आगामी निवडणूक ही सर्वात मोठी लढाई असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.तसेच शिंदे सरकारने आनंदाचा शिधा, शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश या सगळ्यात भ्रष्टाचार केला. शिंदे सरकार जेव्हा दावोसला गेले, तेव्हा चार दिवसांत 45 कोटी रुपये उडवून आले. आमच्या सरकारच्या काळात दावोस आर्थिक परिषदेला गेलो होतो, तेव्हा महाराष्ट्रात 80 हजार कोटींची गुंतवणूक आणली होती, असा दावाही त्यांनी केला.