Maharashtra Assembly Elections 2024 : उद्या (मंगळवारी) राज्यात विधानसभेसाठी आचारसंहिता (Maharashtra Assembly Elections 2024) लागण्याची दाट शक्यता आहे. त्यापूर्वीच आज राज्य मंत्रिमंडळाची शेवटची आणि महत्त्वाची बैठक पार (Maharashtra Cabinet Meeting) पडत आहे. या बैठकीमध्ये अनेक लक्षवेधी निर्णय घेतले जात असून, याकडे सध्या राज्याचे लक्ष लागून आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून कोणत्याही क्षणाला आचारसंहिता लागू शकते. उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. मंत्रालयात हालचाली गतीमान झाल्या असून सुट्टीच्या दिवशीही मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. रविवारी सुट्टी असतानाही सामाजिक न्याय विभागाचे सात शासन निर्णय जारी करण्यात आले आहे. आज पुन्हा सकाळीच मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आहे. महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जाणार आहेत.
मिळालेल्या महितीनुसार, १० नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर यादरम्यान राज्यात मतदान तर, २० ते २५ नोव्हेंबर दरम्यान मतमोजणी होऊ शकते. कारण २६ नोव्हेंबरला राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे, त्याआधी नवे सरकार सत्तेत येईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. अशास्थितीत या आठवड्यात कोणत्याही क्षणी राज्यात निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते.
राज्यात मंत्रिमंडळाची शेवटची बैठक ४ ऑक्टोबर पार पडली होती, या बैठकीत ३३ महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते. ४ ऑक्टोबर रोजी पार पडलेली ही बैठक शेवटची असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र सोमवारी सकाळी अचानक साडेनऊ वाजता पुन्हा एकदा मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले, अशा स्थितीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर कधीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.