Pune Metro : पुण्यातील (Pune) खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग या मार्गावरून मेट्रो धावणार आहे. या दोन मेट्रो मार्गांना महायुती सरकारने (MahaYuti) कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शहरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होईल.
पुण्यात वाढते ट्रॅफिक पाहता तसेच शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे केद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आभार मानले आहेत. आज (सोमवारी) पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
या कॅबिनेट बैठकीत खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग या दोन मार्गांना मंजुरी मिळाली आहे. या दोन मार्गांमुळे पुणे शहरातील मेट्रोचे जाळे चौफेर वाढणार आहे. राज्य सरकारने या दोन मेट्रो प्रकल्पांसाठी 9 हजार 897 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.
पुण्यातील खडकवासल्याहून खराडीकडे जाणाऱ्या मेट्रो मार्गामध्ये दळवीवाडी, नांदेड सिटी, धायरी फाटा, माणिकबाग, हिंगणे, राजाराम पूल, पु.ल. देशपांडे उद्यान, दांडेकर पूल, स्वारगेट स्थानक असणार आहे. तसेच हा मार्ग पुढे हडपसर मार्गे खराडीला जाणार आहे. दुसरी मेट्रो नळस्टॉपपासून पौड फाटा, कर्वे पुतळा, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, वारजे, दौलत नगर (सनसिटी) या मार्गे माणिकबागेला जाणार आहे. राज्य सरकारने नव्या मार्गांना मंजुरी दिल्याने पुणेकरांचा प्रवास जलद होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज तातडीने राज्य सरकराने मंत्री मंडळाची बैठक बोलावली होती. राज्यात लवकरच विधानसभा निवडणूका लागणार असून, महायुती सरकराची ही शेवटची बैठक असल्याचे बोलले जात आहे. याचदरम्यान, महायुती सरकारकडून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. आजच्या पार पडलेल्या या बैठकीत पुणे मेट्रोसहित मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाच टोलनाक्यावर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.