Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत (Maharashtra Assembly Elections) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आज (मंगळवारी) भारतीय निवडणूक आयोग ३.३० वाजता पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहे.
यापूर्वी निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीरसोबत निवडणुका घेणे शक्य नसल्याचे सांगितले होते. काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने दोन्ही राज्यांचा दौरा केला होता. त्यावेळी आयोगाने निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला होता.
दरम्यान, महाराष्ट्रातील राजकारणात सध्या अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. नुकतीच अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावर तापलेले पाहायला मिळत आहे. अशातच आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होत असून, यावेळी महाराष्ट्रात एक किंवा दोन टप्प्यात मतदान होऊ शकते.
महाराष्ट्राप्रमाणेच झारखंडमध्येही मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अशातच झारखंडमध्ये एक ते तीन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. नक्षलग्रस्त भाग लक्षात घेऊन मतदानाचे टप्पे ठरवले जाऊ शकतात.
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत असून, त्याचबरोबर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी ५ जानेवारीला संपणार आहे. अशा स्थितीत दोन्ही राज्यांमध्ये 10 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर यादरम्यान मतदान होण्याची शक्यता आहे. तर 20 ते 25 नोव्हेंबर दरम्यान मतमोजणी होऊ शकते.
काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर जाहीर झाले आहेत, जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाले तर हरियाणामध्ये भाजपने एकहाती विजय मिळवला. अशातच हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रात देखील निकाल लागतील असे बोलले जात आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होणार आहे. अशातच महाराष्ट्रात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.