Justin Trudeau : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी नवी दिल्लीतून कॅनडाच्या सहा राजदूतांना (Ambassador) परत पाठवण्याच्या तसेच कॅनडातून भारतीय राजदूतांना परत बोलवण्याच्या भारताच्या निर्णयावर मंगळवारी पत्रकार परिषद घेतली आहे.
यावेळी जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कारवायांमध्ये गुंतल्याचा आरोप केला आहे. ट्रूडो म्हणाले की, ‘कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु हे प्रयत्न धुडकावले गेले.’ रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस (RCMP) अहवालानंतर पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडातील भारताच्या क्रियाकलापांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
ट्रूडो म्हणाले की, ‘आरसीएमपीकडे “स्पष्ट आणि भक्कम पुरावे” आहेत की सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कारवायांमध्ये भारतीय सरकारी एजंट गुंतले आहेत. ज्यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक वाद आणखी वाढला आहे.
ते म्हणाले की, ‘कॅनडा-भारताचा लोक-लोकांमधील संबंध, व्यापार आणि व्यवसाय यांचा मोठा इतिहास आहे. परंतु आता जे पाहत आहोत ते सहन करू शकत नाही. कॅनडा भारताचा आदर करतो आणि भारत सरकारनेही असेच करावे अशी आमची अपेक्षा आहे.
जस्टिन ट्रुडो पुढे म्हणाले की, ‘पंतप्रधान म्हणून कॅनडातील नागरिकांच्या सुरक्षेची जबादारी माझी आहे, जर कोणी सुरक्षेशी तडजोड करत असेल तर कारवाई करणे ही देखील माझी जबाबदारी आहे.
ट्रूडो म्हणाले की, ‘कॅनडा हा कायद्याच्या राज्यावर आधारित देश आहे आणि आमच्या नागरिकांची सुरक्षा आमच्यासाठी प्रथम येते. आमच्या गुप्तचर सेवांनी कॅनडाच्या भूमीवर हरदीप सिंग निज्जर या कॅनेडियन नागरिकाच्या हत्येमध्ये भारत सरकारचे एजंट थेट सहभागी असल्याचा दावा केला आहे.
याच पार्श्वभूमीवर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि दोन मंत्र्यांनी भारताविरोधात 45 मिनिटांची पत्रकार परिषद घेतली. मात्र, ते पुन्हा एकदा भारत सरकारविरोधात कोणताही पुरावा सादर करण्यात अपयशी ठरले आहेत. यादरम्यान मात्र, कॅनडातील खलिस्तानी दहशवाद्यांवर ट्रूडो यांनी पुन्हा एकदा मौन बाळगले. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याबाबत ते काहीही बोललेल नाहीत.
ट्रूडो यांनी आरोप केला की, कॅनडाच्या भूमीवर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताच्या संभाव्य सहभागाबद्दल गुप्तचरांनी संशय व्यक्त केला होता. तेव्हा या मुद्द्यावर भारत सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
भारतावर केलेल्या या आरोपानंतर मात्र, भारताने सोमवारी कॅनडाच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांची भारतातून हकालपट्टी केली. तसेच कॅनडातून आपल्या उच्चायुक्तांना तसेच इतर अधिकाऱ्यांना परत बोलवण्याची घोषणा केली. शीख फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येशी भारतीय एंजट जोडल्याचा कॅनडाचा आरोप स्पष्टपणे फेटाळताना भारताने ही कारवाई केली आहे.