Vidhansabha Elections 2024 : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) बिगुल वाजले आहे. राज्यामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. मंगळवारी दुपारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष आता कामाला लागले आहेत, अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील कामाला लागली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी राज ठाकरेंनी मोठी घोषणा देखील केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे मोठ्या ताकदीने जोरात लढवत आहे. आम्ही जोषात आणि पूर्ण प्रयत्नाने निवडणूक लढवत आहोत. मी माझ्या सभेमध्ये माझी भूमिका स्पष्ट केली आहे. या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसे पक्ष हा सत्तेमध्ये असणार आहे. सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्त जागा मनसे लढणार आहे. किती काय हे तुम्हाला लवकरच समजेल. असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
पुढे त्यांनी निवडणुकीच्या तयारीबद्दल बोलताना सांगितले की, ‘मनसेचा जाहीरनामा लवकरच येईल. त्यात काय असेल हे तेव्हाच समजेल. लढवायच्या म्हणून लढवत नाही. 2014 ला लढवल्या. 2009 लाही लढवल्या. मी युती आघाडी बद्दल आता काहीही बोलणार नाही. असही राज ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.