पुणे -कोरोनाच्या काळात जात, पंथ, भाषा आणि प्रांताचे भेद ओलांडत भारतीयांनी होतकरूंना मदत केली. जगात हे कोठेच घडले नाही. कारण ‘वसुधैव कुटुंबकम्’ असा विचार मांडणाऱ्या भारताची आध्यात्म ही जीवनदृष्टी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले आहे .
फर्ग्युसन महाविद्यालयात नेस्ट भारत संस्थेच्या सहकार्याने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी ‘आयडीया ऑफ भारत’ या विषयावर संवाद साधला. यावेळी एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष फरांदे, नेस्ट फाउंडेशनच्या डॉ. कल्याणी संत, महाविद्यालयाचे वैष्णवी सर्वज्ञ, भार्गवी देशमूख, डॉ. प्रिती आफळे आदि उपस्थित होते.
भारताची वैशिष्ट्ये कोणती आणि ती का आहेत ? असा थेट प्रश्न डॉ. वैद्य यांनी विद्यार्थ्याना विचारला. ते म्हणाले, सहिष्णुतेच्या पलिकडे जात सर्वांचा स्वीकार करणाऱ्या भारताची राष्ट्रीय जीवनदृष्टी अद्वितीय आहे. संस्कृती एकच आहे मात्र विविध पद्धतीने ती प्रकट होत आहे. प्रत्येकाच्या उपासना पद्धतीचे सन्मान करणाऱ्या भारतात खऱ्या अर्थाने आध्यात्मिक लोकशाही आहे. आपल्या समृद्ध परंपरेचा अभिमान बाळगत त्यातील दोषांचे निर्मूलन करायला हवे. अस्पृष्यता आणि जातीपातीतील भेद दूर करत, महिलांनाही समान संधी उपलब्ध करून देणे म्हणजे राष्ट्रीय होत जाणे, असेही डॉ. वैद्य म्हणाले.
विकसित भारताच्या संकल्पनेबद्दल बोलताना डॉ. वैद्य म्हणाले, विकसित भारत म्हणजे नक्की काय याचा विचार हवा. पाश्चिमात्यांसारखे होणे म्हणजे विकसित होणे नव्हे. विकसित ऐवजी समृद्ध भारतासाठी आपण आज प्रयत्न करायला हवे. आपल्या मागच्या पिढीने स्वातंत्र्यासाठी आयुष्य खर्ची केले. आपणही येणाऱ्या पिढीला समृद्ध भारत मिळावा म्हणून कार्य करायला हवे.
भारत हे सामाजिक राष्ट्र असले तरी आजही आपली विचारदृष्टी युरोपकेंद्रीत असल्याची खंत डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, पश्चिमेतील १६ व्या शतकात राष्ट्र ही संकल्पना आली. भारतात मात्र वेदकाळापासून राष्ट्र ही संकल्पना आहे. भारतीय राष्ट्र हे राज्याधारीत (स्टेट) नाही तर समाजाधारीत आहे. आध्यात्मिक साधना आणि भौतिक समृद्धी साधणे हे भारताचे राष्ट्रीय चिंतन आहे.
डॉ. मनमोहन वैद्य यांच्या भाषणातील काही प्रमुख मुद्दे ;
– युरोपकेंद्रीत नव्हे तर भारतकेंद्रीत विचारदृष्टी हवी
– हिंदुत्व ही जीवनदृष्टी असून ती भारताचा आत्मा आहे
– समाज म्हणून आपण कोण याची जाणीव झाली तर दिशा मिळेल
– भारतात सांस्कृतीक विविधता नाही तर एकाच संस्कृतीची विविध रूपे आहेत
– आपल्यातील दोष दूर करत जाणे म्हणजेच राष्ट्रीय होणे