Narendra Modi : जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुका (Jammu and Kashmir) 2024 च्या निकालांमध्ये, NC आणि काँग्रेस आघाडीने बहुमत मिळवले. दोन्ही पक्षांना मिळून 48 जागा मिळाल्या. एकट्या एनसीला 42 तर काँग्रेसला 6 जागा मिळाल्या, त्यानंतर आज म्हणजेच बुधवारी ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. अधिकृत वेबसाईट X वर पोस्ट करत पीएम मोदी म्हणाले की, ‘जम्मू आणि काश्मीरच्या प्रगतीसाठी ओमर आणि त्यांच्या टीमसोबत जवळून काम करेल.’
आज जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सक्सेना यांनी श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (SKICC) येथे अब्दुल्ला आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला पदाची शपथ दिली. यावेळी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अखिलेश यादव, प्रकाश करात, कनिमोझी, मेहबुबा मुफ्ती उमर यांसारखे नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल ओमर अब्दुल्ला यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, “ओमर अब्दुल्ला जी यांचे जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन….जनतेची सेवा करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना शुभेच्छा….जम्मू-काश्मीरच्या प्रगतीसाठी केंद्र त्यांच्या आणि त्यांच्या टीमसोबत जवळून काम करेल.’
शपथविधी सोहळ्यापूर्वी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी श्रीनगरमधील “शेर-ए-काश्मीर” शेख मोहम्मद अब्दुल्ला यांच्या मजार-ए-अन्वर येथे पुष्पांजली वाहिली. यानंतर शपथ घेताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, ‘त्यांच्या सरकारला या भागातील लोकांसाठी खूप काही करायचे आहे. हे जनतेचे सरकार आहे आणि त्यांचे ऐकले जाईल.’
जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली, ज्यामुळे केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर नवीन सरकारची स्थापना झाली. कलम 370 रद्द केल्यानंतर आणि पूर्वीच्या राज्याची दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुनर्रचना केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील हे पहिले निवडून आलेले सरकार आहे.