Justin Trudeau : भारत आणि कॅनडा (Canada–India relations) यांच्यात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. शीख फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमुळे दोन्ही देशांमधील परिस्थिती पुन्हा एकदा तणावपूर्ण बनली आहे. निज्जर याच्या हत्येसाठी कॅनडा सातत्याने भारतावर आरोप करत आहे. भारत देखील यासंबंधीचे पुरावे मागत आहे.
अशा स्थितीत सोमवारी भारताने मोठा निर्णय घेत कॅनडातून आपले उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि इतर राजनैतिक अधिकाऱ्यांना परत परत बोलवले आहे. यासोबतच भारताने कॅनडाच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांची भारतातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने दिल्लीतील कॅनडाच्या उच्चायुक्तांना यासंबंधित समन्स देखील पाठवले आहेत.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी मंगळवारी भारत सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप केला होता. यामध्ये दक्षिण आशियाई कॅनेडियन लोकांना लक्ष्य करून गुप्त ऑपरेशन चालवणे जात असल्याचा आरोप त्यांनी भारतावर केला.
दरम्यान, भारतावर आरोप करणारे ट्रूडो यांनी युटर्न घेतला आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी भारताला कोणतेही ठोस पुरावे देण्यात आले नसल्याची कबुली त्यांनी स्वतः दिली आहे. याप्रकरणाच्या सार्वजनिक चौकशीपूर्वी त्यांनी ही माहिती दिली.
बुधवारी ट्रुडो यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारतावर कोणतेही पुरावे नसताना आरोप करण्यात आले आहेत. ते म्हणाले की, ‘त्यावेळी ही प्रामुख्याने गुप्तचर माहिती होती, आमचे आरोप ठोस पुराव्यावर आधारित नव्हते.’
ट्रुडो यांच्या कबुलीनंतर भारतानेही देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, कॅनडाचे आरोप खोटे आणि पुराव्याशिवाय आहेत हे आम्ही सातत्याने सांगत आहोत. भारत आणि कॅनडा यांच्यातील बिघडलेल्या संबंधांसाठी जस्टिन ट्रूडो पूर्णपणे जबाबदार आहेत.
भारतावर कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप कारणे ट्रूडो यांना आता महागात पडले आहे. त्यांच्याच देशातून आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. कॅनडाच्या एका लिबरल खासदाराने पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना पक्षाचे नेतेपद सोडण्यास सांगितले आहे. तसेच कॅनडातील नागरिक देखील ट्रूडो यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.