DY Chandrachud : सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दुसरे वरिष्ठ न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना सरन्यायाधीश (CJI) बनवण्याची शिफारस केंद्र सरकारला पाठवली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होत आहेत. तर न्यायमूर्ती खन्ना हे ११ नोव्हेंबरपासून सरन्यायाधीश होतील. त्यांचा कार्यकाळ पुढील सहा महिन्यांचा असेल. कारण न्यायमूर्ती संजीव खन्ना पुढील वर्षी 13 मे 2025 रोजी निवृत्त होणार आहेत.
गेल्या शुक्रवारी (11 ऑक्टोबर 2024), केंद्र सरकारने CJI यांना पत्र लिहून मेमोरँडम ऑफ प्रोसिजरनुसार त्यांची शिफारस पाठवण्यास सांगितले होते. त्यानंतर डीवाय चंद्रचूड यांनी संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली आहे. सरकारने मान्यता दिल्यास न्यायमूर्ती खन्ना हे भारताचे ५१ वे सरन्यायाधीश होतील.
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची 1983 मध्ये दिल्ली बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी झाली होती. त्यांनी सुरुवातीला तीस हजारी कॉम्प्लेक्स येथील जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस केली आणि नंतर दिल्ली उच्च न्यायालयात आणि न्यायाधिकरणांमध्ये प्रवेश केला.
कोण आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना?
संजीव खन्ना यांनी दीर्घकाळ आयकर विभागात वरिष्ठ स्थायी वकील म्हणून काम केले आहे. नंतर 2004 मध्ये त्यांची दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेशासाठी स्थायी वकील (सिव्हिल) म्हणून नियुक्ती झाली.
2005 मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती देण्यात आली आणि 2006 मध्ये त्यांना कायम न्यायाधीश बनवण्यात आले. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी दिल्ली अकादमी, दिल्ली आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र आणि जिल्हा न्यायालयाचे अध्यक्ष/प्रभारी पदही भूषवले आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना 18 जानेवारी 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनवण्यात आले. न्यायमूर्ती खन्ना हे त्या न्यायाधीशांपैकी एक आहेत ज्यांना कोणत्याही उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होण्यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती देण्यात आली होती.
त्यांनी 17 जून 2023 ते 25 डिसेंबर 2023 पर्यंत सर्वोच्च न्यायालय विधी सेवा समितीचे अध्यक्षपद भूषवले आणि सध्या ते राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष आणि राष्ट्रीय न्यायिक अकादमी, भोपाळच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य आहेत.