Israel–Hamas war : गुरुवारी इस्त्राईल लष्कराने हमास (Israel–Hamas war) प्रमुख याह्या सिनवारला (Yahya Sinwar) ठार केले आहे. इस्त्राईल लष्कराने स्वतः याबद्दल निवेदन सादर करत माहिती दिली आहे. इस्त्राईलचे परराष्ट्र मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी याह्या सिनवारच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. इस्त्राईल गेल्या एक वर्षापासून याह्या सिनवारचा शोध घेत होते. अखेर इस्त्राईलला त्याला शोधण्यात यश आले असून, त्याला ठार करण्यात आले आहे.
आयडीएफने सादर केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, ‘सैनिकांनी एका हल्ल्यात हमासच्या तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे. या तीन दहशतवाद्यांमध्ये हमास प्रमुख याह्या सिनवारचा देखील समावेश आहे. इस्त्राईल-हमास युद्धाच्या सुरुवातीपासून सिनवार हा इस्त्राईलच्या मोस्ट वॉन्टेडच्या यादीत सर्वात वरती होता. अशा स्थितीत त्याच्या हत्येनंतर हमासला मोठा धक्का बसला आहे.
गाझामधील कारवाईदरम्यान ठार झालेल्या तीन अतिरेक्यांपैकी एकाच्या मृतदेहाची डीएनए चाचणी घेतल्यानंतर लष्कराने सिनवारच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मात्र, हमास कडून त्याच्या मृत्यूवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
कोण होता याह्या सिनवार?
सिनवार हा 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्त्राईलवरील हमास हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. अशा परिस्थितीत इस्त्राईलने गाझामधील काउंटर ऑपरेशनच्या सुरुवातीपासूनच त्याला ठार मारण्याची शपथ घेतली होती.
गाझामध्ये तो अनेक वर्षे हमासचा सर्वोच्च नेता म्हणून काम करत होता. इस्राईलने 1980 ते 2011 या काळात सिनवारला तुरुंगात देखील डांबले होते. जेव्हा सिनवार तुरुंगात होता त्यादरम्यान त्याच्यावर मेंदूच्या कर्करोगासाठी उपचार करण्यात आले होते. त्यावेळी इस्त्राईली अधिकाऱ्यांनी त्याचे डीएनए नमुनेही घेतले होते. दरम्यान, गुरुवारी जेव्हा त्याच्या हत्येची पुष्टी करण्यात आली तेव्हा त्याच्या डीएनएची चाचणी करून ही पुष्टी करण्यात आली आहे.
इराणची राजधानी तेहरानमध्ये इस्त्राईली हल्ल्यात इस्माईल हनीयेह याची हत्या झाल्यानंतर सिनवार याची हमासचा सर्वोच्च नेता म्हणून निवड करण्यात आली होती.
सिनवार याचा जन्म 1962 मध्ये गाझा येथील खान युनिस निर्वासित छावणीत झाला होता. यानंतर तो हमासचा सदस्य झाला आणि पुढे जाऊन हमासचा प्रमुख बनला. 1980 मध्ये जेव्हा इस्त्राईलने त्याला अटक केली तेव्हा त्याने 12 लोकांची हत्या केली होती.