Benjamin Netanyahu : गुरुवारी इस्त्राईल लष्कराने हमास (Israel–Hamas war) प्रमुख याह्या सिनवारला (Yahya Sinwar) ठार केले आहे. इस्त्राईलने एक निवदेन सादर करत याची माहिती दिली आहे. इस्त्राईलचे परराष्ट्र मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी याह्या सिनवारच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
इस्त्राईलने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्राईलवर झालेल्या हल्ल्याला जबाबदार असलेला याह्या सिनवार आज आयडीएफच्या हल्ल्यात मारला गेला आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये इस्त्राईवर झालेल्या हल्ल्याचा याह्या सिनवार मास्टरमाईंड होता. तेव्हापासून इस्त्राईलने याह्या सिनवारला मारण्याची शपथ घेतली होती. अखेर इस्त्राईली सैनिकांना त्याला मारण्यात यश आले असून, त्याच्या मृत्यूनंतर इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
सिनवार याच्या मृत्यूवर बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, ‘ज्या व्यक्तीने इस्त्राईवर हल्ला केला त्या व्यक्तीचा इस्त्राईली सैनिकांकडून खात्मा करण्यात आला आहे. सिनवारला मारून इस्त्राईलने आपले वचन पूर्ण केले आहे. त्याला मारून आमचा बदला पूर्ण झाला असला तरी युद्ध अजून संपलेले नाही.’
नेतन्याहू म्हणाले की, ‘इस्त्राईली सैन्याने वाईटाचा पराभव केला आहे. पण आमचे मिशन अजून पूर्ण झालेले नाही. यावेळी नेतन्याहू यांनी सिनवारचा मृत्यू हा हमासविरुद्धच्या या युद्धाचा सर्वात महत्त्वाचा क्षण असल्याचे सांगितले आहे.
नेतन्याहू पुढे म्हणाले, ‘इस्त्राईलच्या शूर सैनिकांनी सिनवारला मारले आहे. हा गाझामधील युद्धाचा शेवट नसून शेवटची सुरुवात आहे. गाझातील लोकांसाठी माझा एक संदेश आहे की, ‘जर हमासने आपली शस्त्रे समर्पण केली आणि आमच्या लोकांना सोडले तर हे युद्ध थांबू शकते.’ हमासने गाझामध्ये 101 इस्त्राईली लोकांना डांबून ठेवले आहे. हमासने डांबून ठेवलेल्या नागरिकांमध्ये फक्त इस्राईली नागरिकच नाहीत तर इतर अनेक देशांचे नागरिकही आहेत.
חיסלנו את סינוואר. pic.twitter.com/rq7qGRewzo
— Benjamin Netanyahu – בנימין נתניהו (@netanyahu) October 17, 2024
नेतन्याहू म्हणाले, ‘त्यांच्या सुटकेसाठी इस्राईल काहीही करण्यास तयार आहे. जर तुम्ही आमच्या नागरिकांना सुरक्षित सोडले तर तुमच्या सुरक्षिततेची हमी देतो. पण जर आमच्या नागरिकांना कोणतीही इजा केली तर त्यांच्यासाठी माझा एक संदेश आहे. इस्राईली सैनिक तुम्हाला शोधून तुमचा खात्मा करतील.’ नेतन्याहू म्हणाले, गाझातील लोकांसाठी हा माझ्याकडून आशादायक संदेश आहे.
ते पुढे म्हणाले, नसराल्लाह, मोहसीन, हनीयेह, डेफ आणि आता सिनवार देखील मारला गेला आहे. अशास्थितीत हमासचे कंबरडे आता मोडले असून, त्यांनी आपली शस्त्रे समर्पण करावी.’ असा संदेश नेतन्याहू यांनी दिला आहे.
कोण आहे याह्या सिनवार?
इस्राईलवर 7 ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड याह्या सिनवार होता. सिनवार हा या वर्षी ऑगस्टमध्ये हमासचा प्रमुख बनला होता. इस्राईलकडून इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यात इस्माईल हनीयेह याची हत्या झाल्यानंतर सिनवारकडे हमासची कमान सोपवण्यात आली होती.