Harmanpreet kaur : बीसीसीआयने (BCCI) गुरुवारी न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी (One day cricket) भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत भारतीय संघाची कमान हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet kaur) हाती देण्यात आली आहे. यापूर्वी हरमनप्रीत कौरला कर्णधार पदावरून हटवण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, बीसीसीआयने हरमनप्रीत कौरला दिलासा दिला असून, तिची पुन्हा एकदा कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
24 ऑक्टोबरपासून दोन्ही संघ एकदिवसीय मालिकेत एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. खास गोष्ट म्हणजे, न्यूझीलंडविरुद्धच्या लढाईत भारतीय संघात 4 नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. टी-20 विश्वचषकातून भारत लवकर बाहेर पडल्यानंतर कर्णधार म्हणून हरमनप्रीतच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, निवड समितीने सध्या हरमनप्रीतसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिन्ही वनडे सामने हे गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे खेळवण्यात येणार आहेत. नुकत्याच ऑस्ट्रेलियात भारत अ संघाचा भाग असलेल्या अनकॅप्ड खेळाडूंना देखील वनडे सामन्यात संधी देण्यात आली आहे. ज्यात तेजल हसबनीस, सायली सतगरे आणि प्रिया मिश्रा यांचा समावेश आहे. तर टी-20 विश्वचषकात खराब फॉर्ममध्ये असलेल्या स्मृती मानधनाला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली फलंदाज उमा छेत्री देखील संघाचा एक भाग आहे आणि ती या मालिकेतून वनडे पदार्पण करू शकते.
भारतीय संघ खालीलप्रमाणे :-
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, डी हेमलता, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, यास्तिका भाटिया, उमा छेत्री, सायली सतगरे, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, तेजल हसबनीस, सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा, राधा यादव, श्रेयंका पाटिल.