Benjamin Netanyahu : इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यासाठी इस्राईलने इराणला जबाबदार धरले आहे. इराणने (Iran) त्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप इस्राईलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. काल हिजबुल्लाहने तीन ड्रोन हल्ले केले आहे. हिजबुल्लाहने पंतप्रधानांच्या निवासस्थानच्या आवारात हे ड्रोन हल्ले केले आहेत. इस्त्राईली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, यापैकी दोन ड्रोन पाडण्यात आले, तर एक ड्रोन पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळील इमारतीवर येऊन आदळला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, इराणने नेतान्याहू यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. आयडीएफने सांगितले की, ड्रोन लेबनॉनमधून सोडण्यात आले असून हल्ल्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. इस्राईलच्या आरोपांवर सध्या इराणकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
या ड्रोन हल्ल्यादरम्यान लोकांना कोणताही इशारा मिळाला नसल्याचे बोलले जात आहे. कारण इस्राईलचे सुरक्षा रक्षक कोणत्याही हल्ल्याची जाणीव होताच नागरिकांना सायरनद्वारे सावध करतात. मात्र, नेतान्याहू यांच्या निवासस्थानाला लक्ष्य करणाऱ्या ड्रोनची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली नाही.
दरम्यान, कालच्या घटनेत इस्राईलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, सायरन यंत्रणेत मोठ्या त्रुटी आढळून आल्या आहेत, त्या दुरुस्त करण्याचे काम सध्या सुरू आहे.
पंतप्रधानांच्या निवासस्थानी हल्ला करण्यात आलेली ड्रोन्स “झियाद 107” मॉडेलची होती. हा ड्रोन सहसा शोधणे कठीण आहे. त्याची उंची, आणि त्याच्या उड्डाणाची उंची यामुळे या ड्रोनला शोधणे अधिक कठीण जाते. कालच्या घटनेत हे 3 ड्रोन सोडण्यात आल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. या ड्रोनचा पाठलाग करताना दोन ड्रोन हाणून पाडण्यात इस्राईली सैनीकांना यश आले तर एक ड्रोन पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळील इमारतीवर येऊन आदळला आहे.