Delhi blast : दिल्लीतील रोहिणी येथील प्रशांत विहार (Prashant Vihar) परिसरात रविवारी झालेल्या स्फोटामुळे (Delhi blast) संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. CRPF (केंद्रीय राखीव पोलीस दल) शाळेच्या भिंतीजवळ हा स्फोट झाला असल्याचे बोलले जात आहे, येथे झालेल्या स्फोटानंतर परिसरात प्रचंड धुराचे लोट पाहायला मिळाले आहेत. अचानक झालेल्या या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रोहिणीचे डीसीपी अमित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘स्फोटाचे खरे कारण शोधण्यासाठी यंत्रणा काम करत आहेत. हा स्फोट कोणत्या प्रकारचा होता आणि त्याचा स्रोत कोणता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तज्ज्ञांचे पथक या घटनेचा सखोल तपास करत असून लवकरच परिस्थिती स्पष्ट होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
घटनेचे गांभीर्य पाहून दिल्ली पोलिसांनी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) च्या टीमला घटनास्थळी पाचारण केले आहे. एफएसएल टीम आता पुढील तपास करत असून, हा हल्ला होता की अपघात याचा शोध घेतला जात आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या अनेक टीमही घटनास्थळी हजर असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची देखील तपासणी केली जात आहे.
सीआरपीएफ शाळेजवळ अनेक दुकाने आहेत, त्यामुळे प्राथमिक तपासात हा सिलिंडरचा स्फोट असण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. स्फोटाची तीव्रता लक्षात घेता हा अधिक तीव्रतेचा स्फोट मानला जात आहे.
याप्रकरणी स्फोटक कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्यात येणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या पथकाने दिली आहे. स्थानिक पोलिस या प्रकरणाची नोंद करतील, जे नंतर एफएसएल अहवाल आल्यानंतर विशेष युनिटकडे सोपवले जाईल.
एनएसजी (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) लाही या घटनेची माहिती देण्यात आली असून त्यांची टीमही घटनास्थळी काही वेळात पोहोचू शकते. घटनास्थळी पांढऱ्या पावडरसारखा पदार्थ दिसून आला असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे. सध्या संपूर्ण परिसर सील केला असून केंद्रीय यंत्रणांची पथकेही घटनास्थळी पोहोचू शकतात.
दिल्लीतील रोहिणी येथील सीआरपीएफ शाळेपासून 200-250 मीटर अंतरावर रविवारी सकाळी कमी तीव्रतेचा स्फोट झाला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही दिलासादायक बातमी आहे. घटनेची माहिती मिळताच 89 वी बटालियन, दिल्ली पोलीस, एफएसएल टीम आणि फायर ब्रिगेडचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. आतापर्यंत घटनास्थळी कोणतेही संशयास्पद साहित्य आढळून आलेले नाही. हा स्फोट कशामुळे झाला याचा आता शोध घेतला जात असून, लवकरच याबाबत माहिती दिली जाईल.