Womens T20 World Cup 2024 : महिला टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने शानदार विजयाची नोंद करत पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.
न्यूझीलंडचा शेवटचा सामना रविवारी दक्षिण आफ्रिकेशी झाला. दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाने शानदार प्रदर्शन करत 32 धावांनी विजय मिळवला. या विजयासह इतिहास रचत न्यूझीलंडने प्रथमच टी-20 विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा केला आहे.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 158/5 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तराच्या डावात आफ्रिका संघाला चांगला डाव करता आला नाही आणि संघ 126 धावांवर सर्वबाद झाला.
अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम खेळताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नव्हती. त्यांची पहिली विकेट अवघ्या 16 धावांवर पडली होती. यात जॉर्जिया प्लिमरला केवळ 9 धावा करता आल्या. यानंतर सुझी बेट्स आणि अमेलिया केर यांनी मिळून डावाची धुरा सांभाळली आणि संघाची धावसंख्या 50 च्या पुढे नेली. पुढे बेट्स 31 चेंडूत 32 धावा करून बाद झाली. या डावात मात्र, कर्णधार सोफी डिव्हाईनला विशेष कामगिरी करता आली नाही. सोफी डिव्हाईन फक्त 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. या डावात अमेलिया केरने 44 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पुढे ब्रुक हॅलिडेनेही आपले हात उघडले आणि 28 चेंडूत 38 धावांचे योगदान दिले. मॅडी ग्रीन 12 धावांवर तर इसाबेला गेज 3 धावांवर नाबाद राहिली. संपूर्ण षटक खेळल्यानंतर न्यूझीलंडने 5 गडी गमावून 158 धावा केल्या होत्या.
न्यूझीलंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. लॉरा वोल्वार्ड आणि ताजमिन ब्रिट्स यांनी पहिल्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. ही जोडी फ्रॅन जोनासने तोडली. यानंतर दक्षिण आफ्रिकेला चांगला खेळ करता आला नाही. संघाचे केवळ 4 फलंदाजच दुहेरी आकडा पार करू शकले. वोल्वार्डने संघाकडून सर्वाधिक 33 धावा केल्या. तर अमेलिया केरच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर आफ्रिकेचा संघ पूर्णपणे हतबल दिसला. संपूर्ण षटक खेळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 9 विकेट गमावून केवळ 126 धावाच करता आल्या. अमेलिया केरने अवघ्या 23 धावांत आफ्रिकेचे 3 फलंदाज बाद केले होते.