World Summit 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी वर्ल्ड समिटमध्ये बोलताना भारत हा जगासाठी आशेचा किरण असल्याचे म्हंटले आहे. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात भारताचा जगात वाढणारा दर्जा आणि तिसऱ्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण निर्णयांबद्दल सविस्तर चर्चा केली आहे. तसेच भारताच्या विकासावरही भाष्य केले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आज संपूर्ण जगामध्ये अशांतता असताना भारत आशेचा किरण म्हणून समोर आला आहे. आज भारत प्रत्येक क्षेत्रात वेगाने काम करत आहे.’
पुढे मोदी म्हणाले, ‘सध्या भारतात खूप काही घडत आहे, आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारताने वेग पकडला आहे. आमच्या सरकारला 125 दिवस पूर्ण झाले आहेत. त्याचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 125 दिवसांत गरिबांसाठी 3 कोटी नवीन पक्की घरे मंजूर करण्यात आली असून 125 दिवसांत 9 लाख कोटी रुपयांच्या पायाभूत प्रकल्पांवर काम सुरू करण्यात आले आहे. तसेच 15 नवीन वंदे भारत गाड्या चालवण्यात आल्या आहेत, तर 8 नवीन विमानतळांवर काम सुरू झाले आहे. तरुणांसाठी 2 लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे.
पंतप्रधान पुढे म्हणाले, ’21 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत. 70 वर्षांवरील वृद्धांसाठी 5 लाख रुपयांहून अधिक किमतीच्या उपचारांची व्यवस्था केली आहे.’
‘125 दिवसांत सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये देखील 6-7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आमचे परकीय चलन 650 अब्ज डॉलर्सवरून 700 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढले आहे.’
पंतप्रधान म्हणाले, ‘आज भारत जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. या तरुण देशाची क्षमता आपल्याला आकाशाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकते. आम्हाला अजून खूप काही करायचे आहे आणि ते खूप वेगाने करायचे आहे.’
पंतप्रधानांच्या म्हणण्यानुसार, ‘आता भारत पुढचा विचार करून पुढे जात आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचा संकल्पही याच विचारसरणीचे प्रतिबिंब आहे. 140 कोटी लोक विकसित भारताच्या संकल्पात सामील झाले आहेत.’
एआयच्या जगात भारताच्या वाढत्या पावलाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले, ‘हे एआयचे युग आहे, जगाचे वर्तमान आणि भविष्य हे एआयशी जोडलेले आहे. जगात फक्त एक AI आहे, भारताला दुहेरी AI पॉवरचा फायदा आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या सहाय्याने आपल्याकडे ‘आकांक्षी भारत’ची ताकद आहे.
10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर
गेल्या 10 वर्षांतील जलद गरीबी निर्मूलन कार्यक्रमाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, ‘भारत आज एक विकसनशील देश आणि एक उदयोन्मुख शक्ती आहे. आम्ही गरिबीची आव्हाने समजून घेतो आणि प्रगतीचा मार्ग कसा मोकळा करायचा हे देखील जाणतो. आमचे सरकार वेगाने धोरणे बनवत आहे आणि नवीन सुधारणा करत आहे. गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत.’
125 दिवसांत भारतात 3 महत्त्वाच्या जागतिक घटना घडल्या
भारतावरील जगाच्या वाढत्या विश्वासावर चर्चा करताना पंतप्रधान म्हणाले, ‘भारतातील दूरसंचार आणि डिजिटल भविष्यावर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आले होते. ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल पार पडला, ग्लोबल सेमीकंडक्टर इकोसिस्टमवर चर्चा झाली आहे. नवीकरणीय ऊर्जा आणि नागरी उड्डाणाच्या भविष्यावर आंतरराष्ट्रीय परिषद भारतात आयोजित करण्यात आली होती. ही केवळ घटनांची यादी नाही तर ती भारताशी निगडित आशांची यादी आहे. असे मोदींनी म्हंटले आहे.