Pune News : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly elections 2024) बिगुल आता वाजले असून, महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. अशातच आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात आचारसंहिता लागू असताना काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. याप्रकरणी त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसबा पेठ विधानसभेतील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याशी संलग्न असणाऱ्या हिंदमाता प्रतिष्ठानकडून दिवाळी सरंजाम वाटप करणारा टेम्पो निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पकडला आहे. नंतर रविवारी रात्री उशिरा रविंद्र धंगेकर तसेच त्यांच्या हिंदमाता प्रतिष्ठान विरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी निवडणूक आयोगातील अधिकारी स्वामीनंद पोतदार यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, टेम्पो चालक तुषार अशोक अंदे तसेच आमदार रविंद्र धंगेकर गुन्हा नोंदवला आहे.
विधानसभा निवडणूकाची आचारसंहिता गेल्याच आठवड्यात लागू झाली आहे. याकाळात मतदारांना आमिष दाखवल्यानंतर गुन्हा नोंदवला जातो. दरम्यान, कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठानकडून दिवाळीनिमित्त मतदारसंघातील नागरिकांना सुगंधी उटणे, उदबत्ती, रांगोळी अशा वस्तू असलेल्या पिशव्यांचे वाटप होत होते. या पिशवीवर धंगेकर यांच्यासह त्यांच्या पत्नी, सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे तसेच एका स्थानिक कार्यकर्त्याचा फोटो छापलेला होता.
दिवाळीचे सामान वाटपाचा असलेला हा टेम्पो रविवारी उशिरा रात्री निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पकडला आहे. याप्रकरणी भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार भारतीय न्याय संहिता कलम १७०(१)(आय), १७३, १२३(१)(ए) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.