Nilesh Rane : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच नेत्यांकडून बैठकांचा धडाका सुरु आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु आहे तर दुसरीकडे महायुतीमधील भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे.
तसेच शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे.
आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अधिकृत माहिती दिली आहे. उद्या ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले आहे. शिवसेना शिंदे गटाकडून राणेंना कुडाळ-मालवण मतदारसंघातून तिकीट देण्याची शक्यता आहे.
अलिकडेच निलेश राणेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतरचे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. आज त्यांनी याबाबत अधीकृत घोषणा केली असून, उद्या ते धनुष्यबाण हाती घेतील.
नारायण राणे यांनी 2005 मध्ये शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता ते भाजपमध्ये आहेत. तर, नितेश राणे हे भाजपचे आमदार आहेत. निलेश राणे यांनी भाजपसाठीच काम करत होते. मात्र 19 वर्षांनंतर राणे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करत आहेत.