पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियाच्या कझान शहरात पोचले आहेत. वोल्गा नदीकाठी तातारस्तानची राजधानी काझान येथे होणाऱ्या दोन दिवसीय शिखर परिषदेत पंतप्रधान सहभागी होणार आहेत. रशियाच्या अध्यक्षतेखाली ही शिखर परिषद पार पडणार आहे.
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ब्रिक्स नेत्यांसोबत डिनरला उपस्थित राहणार आहेत. आज, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्याशी चर्चा करतील असे वृत्त समोर आले आहे. तसेच अनेक नेत्यांशी पंतप्रधान मोदी यांची अनौपचारिक चर्चाही होऊ शकते.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी बुधवारी ब्रिक्सच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. ही बैठक दोन सत्रात पार पडणार आहे.
गेल्या 4 महिन्यांत पंतप्रधान मोदी यांचा हा दुसरा रशिया दौरा आहे. यापूर्वी ते 22 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जुलैमध्ये मॉस्कोला गेले होते जिथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली होती. त्याचबरोबर यावेळी त्यांना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, मॉस्कोमधील क्रेमलिन येथे ऑर्डर ऑफ सेंट ॲण्ड्र्यू द अपोस्टलने सन्मानित करण्यात आले होते.
भारतातून रवाना होण्यापूर्वी एक्स वर एक पोस्ट शेअर करताना, PM मोदींनी लिहिले आहे की, “ब्रिक्स परिषदेत भाग घेण्यासाठी रशियातील कझान येथे आज रवाना होत आहे. भारत ब्रिक्सला खूप महत्त्व देतो आणि मी विविध विषयांवर विस्तृत चर्चेसाठी तसेच इतर नेत्यांना भेटण्यास उत्सुक आहे.”