Maharashtra Assembly elections 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly elections 2024) बिगुल आता वाजले असून, महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. दरम्यान, महायुतीमधील भाजपने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे.
तसेच शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची उमेदवारांची यादी एक दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. यादरम्यानच, अजित पवारांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे चिन्हं हे घड्याळच राहणार असल्याचे कोर्टाने म्हंटले आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळा ऐवजी दुसरा चिन्ह देण्याची मागणी शरद पवार यांच्या वतीने करण्यात आली होती. ही मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. अशा परिस्थितीत अजित पवार गटाकडे तूर्तास तरी घड्याळ चिन्ह राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट या याचिकेवर निर्णय होण्याच्या प्रतिक्षेत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह दिले आहे. निवडणूक आयोगाच्या याच निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मागील काही महिन्यांपासून या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली जात होती. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर याबाबत सुनावणी पार पडली असून, सुप्रीम कोर्टाकडून अजित पवारांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरण प्रकरण देखील सुप्रीम कोर्टात आले आहे. मागील काही महिन्यांपासून या प्रकरणावरील सुनावणी लांबली होती. आता या प्रकरणावर सुनावणीची तारीख 8 नोव्हेंबर ही देण्यात आली आहे.