राज्यातील विधानसभेची निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच महायुतीतील सर्व पक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, आता महाविकास आघाडी कधी यादी जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या महाविकास आघाडीत जागा वाटपावरून एकमत होत नसल्याने महाविकास आघाडीत तणावाचे वातावरण आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे.
संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गट यांच्यातील युती तुटली असल्याची माहिती आहे. जागावाटपात काँग्रेसशी सुरू झालेल्या संघर्षानंतर उद्धव ठाकरे यांनी तुटेपर्यंत ताणू नका, असे आवाहन केले होते. पण आता त्यांच्यात आणि संभाजी ब्रिगेडमध्येच जागावाटपावरून तणाव निर्माण झाल्याने अखेर त्यांच्यातील युती तुटली आहे. संभाजी ब्रिगेड राज्यात ५० पेक्षा जास्त उमेदवार जाहीर करणार असून त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. अशा परिस्थितीत ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
गेली अडीच वर्षे सोबत असलेली युती ऐन विधानसभेच्या तोंडावर तुटली असल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीबाबत ठाकरे गटाने संभाजी ब्रिगेड संघटनेला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे ही युती आता तुटली असून राज्यात संभाजी ब्रिगेड स्वबळावर लढणार असल्याची माहिती ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आणि मुख्य प्रवक्ते डॉ गंगाधर बनबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
राज्यात 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर, 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.