BRICS : भारत युद्धाला नव्हे तर संवाद आणि तडजोडीला पाठिंबा देतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ब्रिक्स परिषदेत म्हंटले आहे. रशिया-युक्रेन संघर्ष शांततापूर्ण वाटाघाटीतून सोडवावा, असा स्पष्ट संदेश मोदींनी यावेळी दिला आहे.
यावेळी मोदी म्हणाले, ‘आम्ही युद्धाचे समर्थन करत नाही, तर संवाद आणि तडजोडीला समर्थन करतो. आणि ज्याप्रमाणे आपण कोविड सारख्या आव्हानांवर एकत्रितपणे मात करू शकलो आहोत, त्याचप्रमाणे भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित, सशक्त आणि समृद्ध भविष्य सुनिश्चित करण्यासाठी आपण नवीन संधी निर्माण करण्यात नक्कीच सक्षम आहोत.’ यावेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि त्यांचे चीनी समकक्ष शी जिनपिंग यांच्यासह ब्रिक्स देशांचे प्रमुख नेतेही ब्रिक्स परिषदेत सहभागी झाले होते.
दहशतवादाशी सामना करण्याचे आवाहन
यादरम्यान पंतप्रधान मोदींनी दहशतवादाचा सामना करण्यासाठी ठोस जागतिक प्रयत्नांची वकिली केली आणि या धोक्याशी लढण्यासाठी कोणतेही दुटप्पी मापदंड नसावेत असे सांगितले आहे. दहशतवाद आणि दहशतवादी वित्तपुरवठा यांचा सामना करण्यासाठी आम्हाला सर्वांच्या एकत्रित आणि खंबीर पाठिंब्याची गरज आहे. या गंभीर प्रकरणात दुटप्पीपणाला जागा नाही. दहशदवाद रोखण्यासाठी आपण सक्रिय पावले उचलण्याची गरज आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील व्यापक अधिवेशनाच्या प्रदीर्घ प्रलंबित मुद्द्यावर आपण एकत्र काम केले पाहिजे, असे देखील मोदी यावेळी म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे, आम्हाला सायबर सुरक्षा आणि सुरक्षित एआयसाठी जागतिक नियमांवर काम करणे आवश्यक आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
‘ब्रिक्समध्ये नवीन देशांचे स्वागत करण्यास भारत सज्ज’
यादरम्यान पंतप्रधान म्हणाले की, भारत ब्रिक्समध्ये भागीदार देश म्हणून नवीन देशांचे स्वागत करण्यास तयार आहे. यावेळी पंतप्रधान म्हणाले, या संदर्भात सर्व निर्णय एकमताने घेतले पाहिजेत आणि ब्रिक्सच्या संस्थापक सदस्यांच्या विचारांचा आदर केला पाहिजे. जोहान्सबर्ग शिखर परिषदेदरम्यान स्वीकारण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्वे, मानके, निकष आणि प्रक्रिया सर्व सदस्य आणि भागीदार देशांनी पाळल्या पाहिजेत, असेही पंतप्रधान म्हणाले आहेत.