Sanjiv Khanna : न्यायमूर्ती संजीव खन्ना (Sanjiv Khanna) हे भारताचे ५१ वे सरन्यायाधीश असतील. संजीव खन्ना हे 11 नोव्हेंबरला शपथ घेणार आहेत. तर 10 नोव्हेंबरला विद्यमान सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड हे निवृत्त होणार आहे. डी.वाय. चंद्रचूड यांच्या जागेवर आता संजीव खन्ना यांची निवड करण्यात आली आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी 8 नोव्हेंबर 2022 रोजी मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता.
काही दिवसांपूर्वीच चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश पदासाठी संजीव खन्ना यांचे नाव सुचविले होते. त्यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी खन्ना यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
कोण आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना?
त्यांची एक वैविध्यपूर्ण कायदेशीर कारकीर्द आहे. 1983 मध्ये त्यांनी दिल्ली बार कौन्सिलमध्ये नोंदणी केली होती. येथूनच त्यांचा कायदेशीर प्रवास सुरू झाला. सुरुवातीला, दिल्ली उच्च न्यायालयात जाण्यापूर्वी, न्यायमूर्ती खन्ना तीस हजारी येथील जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करत होते.
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी घटनात्मक कायदा, लवाद, व्यावसायिक कायदा, कंपनी कायदा आणि फौजदारी कायदा यासह विविध क्षेत्रात सराव केला आहे. त्यांनी आयकर विभागात वरिष्ठ स्थायी वकील म्हणून देखील काम केले आहे. न्यायमूर्ती खन्ना यांची 2005 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली होती. आणि 2006 मध्ये ते कायम न्यायाधीश झाले.
‘या’ निर्णयांमुळे आले चर्चेत
न्यायमूर्ती खन्ना काही महत्त्वाच्या निर्णयांमुळे चर्चेत राहिले आहेत. न्यायमूर्ती खन्ना यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यामुळे केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीचा प्रचार करता आला. न्यायमूर्ती खन्ना लोकशाहीतील सहभागाला किती महत्त्व देतात, हे या निर्णयावरून दिसून आले होते. आणखी एका महत्त्वाच्या प्रकरणात त्यांनी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना जामीन देण्याबाबत बोलले होते. ते म्हणाले होते की, पीएमएलए प्रकरणांमध्ये होणारा विलंब हे जामिनाचे प्रमुख कारण असू शकते.’