Andhra Pradesh : ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या थांबण्याचे नाव काही घेत नाहीयेत. गेल्या 15 दिवसांपासून जगभरातील प्रसिद्ध एअरलाइन्सच्या फ्लाइट्सना बॉम्बच्या धमक्या येत आहेत. तर आता आंध्र प्रदेशातून (Andhra Pradesh) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
तिरुपतीमधील अनेक हॉटेल्सना बॉम्बच्या धमकीचे ईमेल आले आहेत. या ईमेलमध्ये ड्रग स्मगलिंग नेटवर्कचा कथित लीडर जाफर सादिक याच्या नावाचा उल्लेख आहे. ज्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि ईडीने अटक केली होती.
ईमेल मिळाल्यानंतर हॉटेल व्यवस्थापकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली आहे. पोलिसांनी वेळ न घालवता घटनास्थळी पोहोचून सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे. श्वानपथक आणि बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने हॉटेल्सची व्यापक तपासणी करण्यात आली आहे. तपासादरम्यान पोलिसांना काही संशयास्पद आढळले नाही. अशापरिस्थितीत ही अफवा असलयाचे चित्र समोर येत आहे. ज्याचा उद्देश लोकांमध्ये दहशत पसरवणे हा होता.
ईमेलद्वारे मिळाली धमकी
या ईमेलमध्ये काही हॉटेल्स बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या, तसेच रात्री 11 वाजेपर्यंत हॉटेल्स रिकामी करण्याचा इशारा या ईमेलमध्ये देण्यात आला होता. जाफर सादिकच्या अटकेमुळे वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावापासून लक्ष हटवणे हा या धमकीचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांची कारवाई
हा धमकीचा ईमेल कोणत्या माध्यमातून पाठवण्यात आला होता, याचा शोध घेण्याचा पोलिस आता प्रयत्न करत आहेत. दरम्यान, तपासानंतर हॉटेलमध्ये चेक-इन आणि चेक-आउटला परवानगी देण्यात आली आहे.
कालच्या घटनेने तिरुपतीमधील सुरक्षा व्यवस्थेला पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून अशा प्रकरणांवर लवकरात लवकर कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दोनदिवसांपूर्वी अशीच एक धमकी मिळाली होती. या धमकीत 85 विमाने उडवणार असल्याचे सांगण्यात आले होते. यामध्ये एअर इंडियाच्या 20 विमानांचा समावेश होता. ज्या विमानांना धमक्या मिळाल्या होत्या त्यामध्ये इंडिगो, विस्तारा आणिआकासा फ्लाइट्सचा समावेश होता.