Sushant Singh Rajput Death Case : सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी महाराष्ट्र सरकार आणि सीबीआयला दणका दिला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबियांविरोधात लुकआऊट नोटीस बजावली होती. ही नोटीस मुंबई हायकोर्टाने रद्द केली होती, मुंबई हायकोर्टाच्या या निकालाला सीबीआयसह सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.
आज (शुक्रवारी) सुप्रीम कोर्टात पार पडलेल्या सुनावणीदरम्यान ही याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. तसेच मुंबई हायकोर्टाचा निकालही कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुप्रीम कोर्टाने अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचे वडील आणि भावाला मोठा दिलासा दिला आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांविरोधात सादर करण्यात आलेले सीबीआय लुकआउट परिपत्रक रद्द करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.
2020 मध्ये सीबीआयने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, वडील लेफ्टनंट कर्नल इंद्रजित चक्रवर्ती आणि आई संध्या चक्रवर्ती यांच्या विरोधात लुकआउट परिपत्रक सादर केले होते. सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करत पटण्यात एफआयआर दाखल केल्यानंतर सुशांतची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे नाव समोर आले होते. हे प्रकरण चिघळत चालल्याने लगेचच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.
दरम्यान, आजच्या सुनावणीत सीसीबीआयने सादर केलेले लुक आऊट परिपत्रक रद्द करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सध्या कायम राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय तसेच सरकारने फटकारले आहे. न्यायमूर्ती बी.आर.गवई म्हणाले की, ‘आम्ही तुम्हाला ताकीद देत आहोत. आरोपींमध्ये एक हायप्रोफाईल व्यक्ती असल्याने ही आव्हान याचिका दाखल केली आहे. ही याचिका फेटाळली जाईल. दोन्ही व्यक्तींचे समाजात मोठे नाव आहे. तुम्हाला याची मोठी किंमत चुकवावी लागेल, अशा इशारा यावेळी कोर्टाने दिला आहे.