Israel attacks Iran : इराणने ( Iran) केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इस्राईलने (Israel ) आज (शनिवारी) इराणवर मोठा हल्ला केला आहे. इराण माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणची राजधानी तेहरानसह आसपासच्या शहरांमध्ये जोरात स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. शनिवारी पहाटे हा हल्ला करण्यात आला आहे. इस्राईलने तेहरानजवळील (Tehran) लष्करी ठिकाणाला लक्ष्य केले आहे. इस्राईलच्या संरक्षण दलानेही इराणवर केलेल्या हल्ल्याला दुजोरा दिला आहे.
इस्राईलने सादर केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, ‘ते इराणच्या लष्करी विभागांवर हल्ले करत आहेत. अनेक महिन्यांपासून इराणकडून सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांना हे प्रत्युत्तर असल्याचे इस्राईलने आपल्या निवेदनात म्हटले आहे. इराणने 1 ऑक्टोबर रोजी इस्राईलवर हवाई हल्ला केला होता. त्याच्या प्रत्युत्तरात इस्राईलने आज (शनिवारी) इराणवर हल्ला केला आहे.
इस्राईली लष्कराने म्हटले आहे की, ‘इराण तसेच त्यांच्याशी संबंधित दहशवादी संघटना हमास आणि हिजबुल्लाह 7 ऑक्टोबरपासून इस्राईलवर सतत हल्ले करत आहेत. जगातील इतर कोणत्याही सार्वभौम देशाप्रमाणे इस्राईललाही प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. आम्हाला आमच्या सुरक्षेसाठी जे काही करावे लागेल ते केले जाईल’, असेही इस्रायली लष्कराने पुढे म्हटले आहे.
इस्राईलने हल्ल्याच्या काही वेळापूर्वीच अमेरिकेला याबाबत माहिती दिली होती. गेल्या महिन्यात हिजबुल्लाह प्रमुख हसन नसराल्लाह मारला गेलेल्या हल्ल्याची माहिती त्यांना आधी देण्यात आली नसल्याने अमेरिकन अधिकारी संतप्त झाले होते. इस्राईलला स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, ‘बायडेन प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे की, ‘या हल्ल्यात अमेरिका सहभागी नाही.’
इस्राईली सैन्याशी संबंधित सूत्रांनी सांगितले आहे की, ‘ते इराणच्या आण्विक किंवा तेल केंद्रांवर हल्ला करणार नाहीत. ते इराणच्या लष्करी विभागांवर लक्ष करत आहेत. इराणच्या तेल किंवा आण्विक केंद्रांवर हल्ले करू नका, असे अमेरिका इस्राईलला सातत्याने सांगत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर युद्ध होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
वृत्तानुसार इस्राईलने मध्यरात्री 2 वाजता इराणच्या दक्षिण आणि मध्य सीरियातील अनेक लष्करी ठिकाणांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्याबाबत इराणने दिलेल्या माहितीनुसार, ‘हवाई संरक्षण यंत्रणेने काही प्रमाणात इस्राईली क्षेपणास्त्रे नष्ट केल्याचा दावा केला आहे. या हवाई हल्ल्यात किती नुकसान झाले याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.