Jayashree Thorat : भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe-Patil) यांच्या युवा संकल्प मेळाव्यात काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कन्येबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याने संगमनेर मधील वातावरण चांगलेच तापले आहे. येथे काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. काल रात्री शुक्रवारी अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात काल 25 ऑक्टोबररोजी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या युवा संकल्प मेळाव्यात भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
युवा संकल्प मेळाव्यात वसंतराव देशमुख यांनी, “तुमच्या कन्येला समजवा, नाहीतर आम्ही निवडणुकीच्या काळात मैदानात उतरलो, तर तुमची कन्या घराबाहेर पडणार नाही. सुजय विखे पाटील, त्यांना ताई म्हणातात. पण सुजयदादा या ताईचे पराक्रम सगळ्या तालुक्याला माहिती आहे.”, असे वक्तव्य केला आहे.
लफडेबाज राधाकृष्ण आचार्य विखे पाटलांचे विकृत कार्यकर्ते या पेक्षा वेगळं काय बोलणार ? या थेरड्याची वाचा जागेवर आणली पाहिजे. @CEO_Maharashtra काहीतरी कारवाई करा, जिवंत आहात हे दाखवून द्या… pic.twitter.com/dDakF7S7Xn
— Vaibhav Kokat (@ivaibhavk) October 25, 2024
वसंतराव देशमुख यांच्या याच वक्तव्याला विरोध दर्शवत काँग्रेसकडून शुक्रवारी रात्री आंदोलन करण्यात आले आहे. काल शहरातील पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेस समर्थकांकडून आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन जयश्री थोरात आणि दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
यावेळी काही अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड तसेच जाळपोळ देखील करण्यात आली. रात्रीपासून सुरू असलेले हे आंदोलन तब्बल 7 तास चालले आणि पहाटे 5 वाजेपर्यंत याप्रकरणी दोन फिर्यादी दाखल करण्यात आल्या, तर तिसरी फिर्याद नोंदवण्याचे काम सुरू आहे.
या घटनेनंतर भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, “वसंत देशमुख यांच्या वक्तव्याचा मी निषेध करणारच होतो. मात्र त्याआधीच त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ सुरु केली, गाड्या फोडल्या, आमच्या लोकांना मारण्याचा प्रयत्न केला आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. पण ज्यांनी गाड्या जाळल्या त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. गाड्या जाळणाऱ्यांचे फोटो, व्हिडीओ आमच्याकडे आहेत. मात्र मला वातावरण पेटवायचे नाही. या सगळ्या प्रकाराबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. माझ्या भाषणात मी जयश्री थोरात यांना ताई म्हणूनच संबोधित करतो. मलाही बहीण आहे, माझ्याही घरात महिला आहेत. मात्र कुणीही महिलांबद्दल खालच्या पातळीवर बोलत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.’
पुढे ते म्हणाले, ‘आचारसंहिता दोन्ही बाजूंसाठी पाहिजे. आज त्या महिला असल्याने त्यांच्या प्रकरणात जनतेने रोष व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बिनडोक मुलगा, बोगस डॉक्टर, हा डोक्यावर पडलाय अशी वक्तव्य माझ्याबद्दल झाली. मग आमचे लोक देखील कायदा सुव्यवस्था हातात घेऊ शकतात. मात्र मला वातावरण पेटवायचे नाही, सर्वांनी संयमाची भूमिका घ्यावी.’ असं सुजय विखे पाटील यांनी म्हंटले आहे.