Bangladesh : बांगलादेशातील चितगावमध्ये हजरोंच्या संख्येने बांगलादेशी हिंदू आपल्या हक्क आणि सुरक्षिततेच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. बांगलादेश सनातन जागरण मंचच्या अध्यक्षतेखाली काल निदर्शने करण्यात आली आहेत. जिथे त्यांनी आपल्या 8 प्रमुख मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत.
अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारासाठी जलद खटला न्यायालये तातडीने स्थापन करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. तसेच, हिंदू पीडितांना नुकसान भरपाई आणि पुनर्वसन सुविधा मिळाव्यात जेणेकरून ते त्यांचे जीवन पुन्हा सुरू करू शकतील. अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
या मागण्यांमध्ये अल्पसंख्याक संरक्षण कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्यावर भर दिला आला आहे. याशिवाय हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन समाजाच्या कल्याणासाठी अधिक चांगले काम करता यावे यासाठी स्वतंत्र अल्पसंख्याक मंत्रालय निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच हिंदू वेल्फेअर ट्रस्टचे ‘हिंदू फाउंडेशन’मध्ये सुधारणा करण्याची आणि त्याचप्रमाणे बौद्ध आणि ख्रिश्चन ट्रस्टींना फाउंडेशनचा दर्जा देण्याची मागणी केली आहे.
याशिवाय ‘प्रॉपर्टी रिकव्हरी अँड प्रिझर्वेशन ॲक्ट’ची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत देखील चर्चा केली आहे. याशिवाय प्रत्येक शैक्षणिक संस्थेत अल्पसंख्याकांसाठी प्रार्थनास्थळे निर्माण करण्याची आणि वसतिगृहांमध्ये प्रार्थना कक्षांची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सनातन जागरण मंचानेही शैक्षणिक सुधारणांकडे लक्ष वेधले आणि संस्कृत आणि पाली शिक्षण मंडळाचे आधुनिकीकरण आणि दुर्गापूजेच्या वेळी 5 दिवस सुट्टी देण्याची मागणी केली आहे. मंचाचे म्हणणे आहे की, बांगलादेशमध्ये प्रत्येक वेळी सरकार बदलले की अल्पसंख्याक हिंदू समुदायावरील हल्ले वाढतात, त्यामुळे त्यांचे जगणे कठीण होते. या मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास ढाका येथे तीव्र निदर्शने करू, असा इशारा सनातन जागरण मंचाने दिला आहे.
शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर आणि बांगलादेशातील सत्तापालटानंतर सातत्याने हिंदूंना लक्ष्य करण्यात येत असल्याच्या बातम्या येत आहेत. मंदिरांमध्ये झालेल्या तोडफोडीचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली होती. याच्या निषेधार्थ यावर्षी ऑगस्ट महिन्यात हजारो हिंदू हातात पोस्टर घेऊन ढाक्याच्या रस्त्यावर उतरले होते. त्यानंतरही त्यांनी घोषणाबाजी करत शांततेचे आवाहन केले होते.