US Election 2024 Updates : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस (Kamala Harris) यांच्यात लढत होणार आहे. मात्र, या निवडणुकांसाठी आधीच मतदान झाले आहे. होय, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अमेरिकेत मतदान ५ नोव्हेंबरला होणार आहे. पण त्याआधीच 3 कोटी मतदारांनी मतदान केले आहे. नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घेऊया…
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत सुमारे 3 कोटी मतदारांनी मतदान केले आहे. बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून येत असून, मतदानासाठी नागरिकांची गर्दी पाहता निवडणूक चुरशीची होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
5 नोव्हेंबरला अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकांपूर्वीच 3 कोटी लोकांनी मतदान केले आहे. पण हे कसे शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर अमेरिकेत निवडणुकांमध्ये मतदारांना काही सुविधा दिल्या जातात. यापैकी एक म्हणजे लवकर मतदानाची करण्याची सोय असते. याचा मुख्य उद्देश निवडणुकीच्या दिवशी अधिक सुविधा प्रदान करणे असा आहे. तसेच लांबलचक रांगा कमी करणे या उद्देशाने देखील लवकरच मतदान करण्याची अनुमती दिली जाते.
कोण मारणार बाजी?
यावेळी जर ट्रम्प जिंकले तर ते दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनतील. आणि जर निकाल कमला हॅरिस यांच्या बाजूने लागला तर त्या इतिहास घडवतील. कमला हॅरिस जर निवडून आल्या तर अशी कामगिरी करण्याऱ्या त्या आफ्रिकन अमेरिकन आणि दक्षिण आशियाई वंशाच्या पहिल्या व्यक्ती ठरतील.
जर आपण आतापर्यंतच्या सर्वेक्षणाबाबत बोललो तर, डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा जास्त पसंती दिली जात आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणाच्या निकालात अनेक प्रमुख राज्यांमध्ये कमला हॅरिस या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढे दिसून आल्या आहेत. मात्र, आता येणार काळच सांगेल अमेरिकेत कोणाचे सरकार स्थापन होणार आहे.