Diwali In White House : भारतात सर्वत्र दिवाळीची जोरदार तयारी सुरु आहे. भारतासोबतच अमेरिकेतही दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली आहे. व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये 600 हून अधिक प्रतिष्ठित भारतीय अमेरिकन उपस्थित होते.
यादरम्यान, अमेरिकन राष्ट्रपतींनी देशभरातील भारतीय अमेरिकन नागरिकांना संबोधित केले, तसेच यावेळी त्यांनी आभार देखील मानले. कार्यक्रमाला उपस्थित लोकांना संबोधित करताना जो बायडेन म्हणाले, ‘राष्ट्राध्यक्ष या नात्याने मला व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याचा तसेच दिवाळीच्या निम्मिताने कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा मान मिळाला, याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार.’
यावेळी मात्र, अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस उपस्थित नव्हत्या. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या कमला हॅरिस सध्या निवडणुकीच्या कामांमध्ये व्यक्त्त असल्यामुळे त्या व्हाईट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या दिवाळी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. कमला हॅरिस सध्या प्रचारात व्यस्त असून, त्या विविध ठिकणी दौरा करत आहेत. म्हणूनच त्या दिवाळी निमित्त आयोजित कार्यक्रमात गैरहजर होत्या.
Tune in as I deliver remarks at a White House celebration of Diwali. https://t.co/72AJ9Fw0lO
— President Biden (@POTUS) October 28, 2024
जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसच्या ब्लू रूममध्ये दिवाळीचा दिवा लावला आणि अमेरिकन लोकशाहीतील त्यांच्या भूमिकेबद्दल दक्षिण आशियाई अमेरिकन समुदायाचे आभार मानले आहे. दक्षिण आशियाई अमेरिकन समुदायामुळे अमेरिकन जीवनाचा प्रत्येक भाग समृद्ध झाला आहे, हे खरे आहे, असे बायडेन यावेळी म्हणाले आहेत.
2003 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली होती. मात्र, दिवाळीच्या कार्यक्रमात त्यांनी कधीही वैयक्तिक सहभाग घेतला नाही. 2009 मध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी देखील व्हाईट हाऊसमध्ये दिवे लावून दिवाळी साजरी केली होती. व्हाईट हाऊसमधील दिवाळी पार्टीला त्यांनी स्वतः हजेरी लावली होती. यानंतर 2017 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष झाल्यावर ही परंपरा पुढे नेली.
2022 मध्ये, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम व्हाईट हाऊसमधील आजवरचा सर्वात मोठा कार्यक्रम होता. तसेच उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी 2023 मध्ये त्यांच्या अधिकृत निवासस्थानी दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.