Abhijeet Bichukale : राज्यात विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections 2024) तोंडावर आल्या असून सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही बारामती मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष आहे. यावेळीही पवार विरुद्ध पवार असा सामना होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेसाठी बारामतीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी देखील बारामतीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काका-पुतण्या आमने-सामने आल्याचे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष बारामतीकडे लागून आहे.
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या बारामतीच्या मतदारसंघात आता आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे. अभिजीत बिचुकले यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे.
अभिजीत बिचुकलेंनी लोकसभा निवडणुकांसाठी कल्याणच्या मतदारसंघाची निवड केली होती. या मतदारसंघात त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना आव्हान दिले होते. पण या निवडणुकीतही अभिजीत बिचुकलेंचा पराभव झाला होता. त्यानंतर आता विधानसभेसाठी अभिजीत बिचुकले यांनी अजित पवारांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
बारामतीतून अर्ज दाखल केल्यानंतर बारामतीकरांना भरभरुन मतदान करण्याचे आवाहन अभिजित बिचुकले यांनी यावेळी केले आहे. तसेच बारामतीची जनता मला निवडून देईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.