Israel : इस्राईल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात सध्या मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू आहे. इस्राईलचे सैन्य गाझामध्ये सातत्याने हवाई हल्ले करत आहे. दरम्यान, इस्राईलने नुकत्याच केलेल्या हवाई हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. इस्राईलने केलेल्या या हल्ल्यात महिला आणि मुलांसह जवळ-जवळ 88 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत तेथील आरोग्य अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
इस्राईलने अलिकडच्या आठवड्यात उत्तर गाझामध्ये हवाई हल्ले वाढवले आहेत. तसेच इस्राईली सैन्य गाझामध्ये घुसून दहशवादी संघटनेविरुद्ध कारवाई करत आहेत. एका वर्षाहून अधिक काळ सुरु असलेल्या या युद्धाचा शेवट आता करणार असल्याचे इस्राईलने नुकतचे म्हंटले आहे. हमास दहशदवादी संघटना पूर्णपणे संपून टाकणार असल्याचे इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, दहशदवादी संघटनेविरुद्ध सुरु असलेल्या या कारवाईत उत्तर गाझामधील हजारो पॅलेस्टिनींची परिस्थितीत बिघडत चालली आहे. गाझामधील वाढत्या हल्ल्यांमुळे तेथील नागरिकांना वेळेवर मदत पोहचत नाहीये. तसेच त्यांना वेळेवर उपचार देखील मिळत नाहीयेत.
सद्यस्थितीवर तेथील आरोग्य मंत्रालयाने माहिती देताना सांगितले की, मंगळवारी उत्तर गाझामधील बीट लाहिया शहरात दोन हल्ले झाले आहेत. पहिल्या हल्ल्यात पाच मजली इमारतीला लक्ष्य करण्यात आले होते, ज्यात किमान 70 लोक ठार झाले आणि 23 बेपत्ता झाले आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात महिला आणि मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार मंगळवारी संध्याकाळी बीट लाहिया येथे झालेल्या दुसऱ्या हल्ल्यात किमान 18 लोक मारले गेले आहेत.