Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. अशातच राज्यातील सर्वच पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. याच पार्श्वभूवर बडे नेते आता महाराष्ट्र दौरा करत आहेत.
दरम्यान, नुकतीच भाजपाकडून त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात प्रचार करण्यासाठी भाजपकडून 40 स्टार प्रचारकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गजांना स्थान देण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 नोव्हेंबर पासून महाराष्ट्र दौऱ्यावर असतील. पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा हा चार दिवसांचा असेल, या चार दिवसांत 9 सभांचे नियोजन करण्यात आले आहे.
8 नोव्हेंबरला महायुतीची पहिली मोठी सभा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा निवडणुकांच्या प्रचार सभांचा नारळ फुटणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील प्रचारसभांमध्ये नाशिक, सोलापूर, मुंबई, अहमदनगर यांसह विविध ठिकाणांचा समावेश आहे.
चार दिवसात 9 सभा
नियोजित कार्यक्रमानुसार 8 नोव्हेंबरला धुळे, नाशिक, 9 नोव्हेंबर रोजी अकोला, चिमूर, 13 नोव्हेंबर रोजी सोलापूर, कोल्हापूर आणि 14 नोव्हेंबर रोजी संभाजी नगर, नवी मुंबई व मुंबई याठिकाणी मोदींच्या सभा होणार आहेत.