US President Election 2024 : अमेरिकेत आज (5 नोव्हेंबर) राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी (US President Election 2024) मतदान होत आहे. अमेरिकेच्या निवडणुकीत उपाध्यक्ष कमला हॅरिस (Kamala Harris) आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस आपल्या समर्थकांना मतदान केंद्रांवर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. आज मतदान झाल्यानंतर काही दिवसात या निवडणुकीचे निकाल लागू शकतात.
नवीन राष्ट्रपती जानेवारी 2025 मध्ये पदाची शपथ घेणार आहेत. दोन्ही पक्ष सध्या स्विंग राज्यांवर लक्ष केंद्रित करताना दिसत आहेत. तर अमेरिकेतील अनेक स्टार्स तसेच हाय प्रोफाईल नेते कमला हॅरिसच्या समर्थनार्थ उभे आहेत. त्याचबरोबर इलॉन मस्क आणि मेल गिब्सन यांसारख्या प्रसिद्ध व्यक्ती ट्रम्प यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरताना दिसत आहेत.
भारतात, सरकार स्थापन करण्यासाठी अनेक टप्प्यांत मतदान होते. याउलट अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकाच दिवशी मतदान होते. अमेरिकेत दर चार वर्षांनी नोव्हेंबरच्या पहिल्या मंगळवारी मतदान होते. 150 वर्षांहून अधिक काळ, युनायटेड स्टेट्समध्ये नोव्हेंबरच्या सुरुवातीला मतदान झाले आहे.
सर्वेक्षण काय सांगते?
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दोन दिवस आधी एक नवीन सर्वेक्षण समोर आले आहे. त्यात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कमला हॅरिस यांच्या पुढे दिसून आले आहेत. यानंतर मात्र, हे सर्वेक्षण ‘बनावट’ असल्याचे आरोप रिपब्लिकन पक्षावर करण्यात आले होते. या सर्व आरोपांना ट्रम्प यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहे. विरोधी पक्ष डेमोक्रॅटिक पक्षाकडून हा सर्वे खोटा असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांचे कमला हॅरिस यांच्यावर गंभीर आरोप
मतदानाच्या काही तास आधी दोन्ही पक्ष मतदारांना आपल्याकडे खेचताना दिसत आहेत. दरम्यान, कमला हॅरिस जिंकल्यास तिसऱ्या महायुद्धाचा धोका असल्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
दुसरीकडे जर कमला हॅरिस यांचा विजयी झाल्यास भारतीय वंशाच्या लोकांसाठी अभिमानाची तसेच इतिहास बदलून टाकणारा दिवस असेल. जर कमला या जिंकून आल्या तर 235 वर्षांनंतर राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादी महिला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार आहे.
मतदान किती वाजता सुरू होणार?
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान वेगवेगळ्या राज्यांच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ ते ९ या वेळेत सुरू होणार आहे. ही वेळ भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 ते रात्री 9.30 पर्यंत असेल. मतदानाच्या शेवटच्या वेळेबद्दल बोलायचे झाल्यास, बहुतेक मतदान केंद्रे संध्याकाळी 6 ते रात्री उशिरापर्यंत सुरू राहू शकतात. म्हणजे अमेरिकेत मतदान संपेपर्यंत भारतात दुसरा दिवस सुरु होईल.
7 कोटींहून अधिक लोकांनी आधीच केले मतदान
अमेरिकेचे 19 कोटी मतदार नवा राष्ट्राध्यक्ष निवडतील. रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांना विजयासाठी 538 इलेक्टोरल मतांपैकी 270 मते मिळवावी लागतील. यामध्ये 7 स्विंग राज्यांचे निकाल अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष कोण होणार हे ठरवतील. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 7.5 कोटीहून अधिक मतदारांनी आधीच मतदान केले आहे. अमेरिकेत आधीच मतदान करण्याची सुविधा दिली जाते. कमला हॅरिस या अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या महिला आहेत. त्याचवेळी डोनाल्ड ट्रम्प सलग तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत.