S. Jaishankar : अमेरिकेत आज (5 नोव्हेंबर) राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी (US President Election 2024) मतदान होत आहे. अमेरिकेच्या निवडणुकीत उपाध्यक्ष कमला हॅरिस (Kamala Harris) आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. संपूर्ण जगाचे लक्ष अमेरिकेच्या निवडणुकांकडे लागले आहे. याचदरम्यान भारतातून मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नुकतेच एक मोठे वक्तव्य केले आहे. जयशंकर यांनी नुकताच ऑस्ट्रेलियन समकक्ष पेनी वोंग यांच्यासह पत्रकारांशी संवाद साधला आहे. यादरम्यान दोन्ही नेत्यांनी जागतिक महत्त्वाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे. त्याचवेळी परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतही चर्चा केली आहे.
अमेरिकेच्या निवडणुकांवर बोलताना जयशंकर म्हणाले, ‘गेल्या पाच राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळात आम्ही अमेरिकेसोबतच्या आमच्या संबंधांमध्ये स्थिर प्रगती पाहिली आहे. यामध्ये ट्रम्प यांच्या कार्यकाळाचाही समावेश आहे. त्यामुळे अमेरिकेतील निवडणुका पाहिल्यावर आम्हाला विश्वास वाटतो की, निर्णय काहीही झाला तरी आमचे अमेरिकेशी असलेले संबंध अधिक दृढ होतील.’
पुढे जयशंकर म्हणाले, ‘ट्रम्प यांच्या कार्यकाळात क्वाड कॉन्फरन्सला गती मिळाली आहे. क्वाड हा भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या चार देशांचा समूह आहे. हे या चार देशांचे एक अनौपचारिक व्यासपीठ आहे, जिथे आशिया-पॅसिफिक क्षेत्राच्या धोरणात्मक सुरक्षा आणि परस्पर सहकार्यावर एकत्र चर्चा केली जाते.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक कधी आहे?
आज अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होत आहेत. येथे रिपब्लिकन पक्षाकडून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅट पक्षाकडून विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस निवडणूक रिंगणात आहेत. दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे.